येणाऱ्या २५ वर्षांचा विचार करून नागपूर मेट्रो परिसराचा विकास करताना रस्ते व वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. नागपूर शहराभोवतीचे निवासी व औद्योगिक क्षेत्र म्हणून नागपूर मेट्रो परिसराचा विचार केला जात असताना, त्याला पूरक अशी रस्ते बांधणी, रस्ते विस्तारीकरण, वाहनतळ उभारणी, वाहतूक सेवा यांचा मोठा पसारा प्रशासनाला सांभाळावा लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्या औद्योगिक विकासाची स्वप्ने नागपूरकरांना दाखवित आहेत, तो विकास प्रामुख्याने याच भागात होणार असल्याने येथील पायाभूत सुविधांचा विकास हा नागपूर मेट्रो विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असणार आहे.
मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र असलेल्या नागपुरात गेल्या काही काळात या वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे व नऊ ठिकाणांहून मालवाहू वाहने शहरात प्रवेश करतात. नागपुरात शहरात आजही पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याने व जड वाहनांच्या पार्किंगमुळे शहराच्या सर्व प्रवेशद्वारांजवळ वाहतूक कोंडीचे व त्यातून अपघाताचे प्रश्न सातत्याने निर्माण होतात. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर अशा घटना वारंवार घडत आल्या आहेत. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या मेट्रो क्षेत्रात मालवाहू वाहनांच्या पार्किंग सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
प्रस्तावित मेट्रो क्षेत्रात अनेक महत्त्वाचे प्रादेशिक रस्ते असून त्यांना जोडणारे स्थानिक रस्त्यांचे जाळे उभे करावे लागणार आहे. एकंदर क्षेत्राच्या तुलनेत आज अस्तित्वात असलेल्या स्थानिक रस्त्यांचे प्रमाण फारच कमी असल्याने ते निर्माण करणे व सांभाळणे हे मोठेच काम प्रशासनाला करावे लागणार आहे. औद्योगिक व निवासी क्षेत्र म्हणून या परिसराचा विकास करताना प्रमुख राज्यस्तरीय मार्गापर्यंत पोहचविणारे स्थानिक रस्ते बांधणे याची आखणी व अंमलबजावणी हे दीर्घकाळ चालणारे काम राहणार आहे.
बाह्य रिंग रोड तसेच मुख्य नागपूर शहराच्या दक्षिणेकडील भागात वेगाने नव्या वसाहतींची वाढ व विकास होत असल्याचे प्रस्तावित आराखडय़ात नमूद करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्राच्या व पर्यायाने वाहतुकीच्या होणाऱ्या वाढीच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत भागातील रस्त्यांच्या रूंदीकरणाची कामेही या आराखडय़ात मांडण्यात आली आहेत. मेट्रो क्षेत्रातील शहरी भागाच्या बाहेर २ हजार ११२ किमी रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्ताावित करण्यात आले आहे तर शहरी क्षेत्रात हाच आकडा सुमारे ४५० किमी इतका आहे. रस्त्यांच्या एकूण कामांचा बहुतांश भाग हा रस्ते रुंदीकरणाचाच आहे. याशिवाय, मालवाहू वाहनांसाठी ११ ठिकाणी तर खासगी वाहनांसाठी ८ ठिकाणी वाहनतळ प्रस्तावित करण्यात आले आहेत. मेट्रो क्षेत्राचा एकंदर विस्तार बघता कागदावर कितीही आकडेवारी दिली तरी प्रत्यक्षात या सुविधा उभारणे हे प्रशासनासाठी कसोटीचे ठरणार आहे.