गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चांडक-बिटको महाविद्यालयातील कार्यक्रम
मनुष्याचे शरीर एक हार्डवेअर असून त्यात योग्य स्पेअर पार्टस् व सॉफ्टवेअर टाकल्यास उत्कृष्ट प्रोग्राम्स तयार होतात असे स्पष्ट करतानाच विद्यार्थ्यांनी स्वत:शी संवाद साधून आपल्यात काय चांगले आहे त्याचा शोध घेण्याचे आवाहन प्रसिध्द व्यावसायिक सोमनाथ राठी यांनी केले. किमान कौशल्याला संभाषणकलेची जोड देऊन आपल्या मनातील कल्पनांना सत्यात उतरून व्यक्तीमत्व घडविण्याचा तसेच संशोधन वृत्ती जोपासून नवनिर्मिती करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील चांडक-बिटको महाविद्यालयात आयोजित किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या समारोपात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्रा जयंत भाभे, समन्वयक प्रा. घनश्याम बाविस्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. कुलकर्णी यांनी विपणन कौशल्यात आपण कुठे कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. या दहा दिवसीय कार्यक्रमात दीपाली कुलकर्णी, डॉ. प्रमोदकुमार हिरे, प्रा. तेजस बेलदार, डॉ. सुनील गायकवाड, प्रा. एस. एम. चपळगावकर, प्रा. जयंत भाभे, डॉ. अंजली गौतम आदींनी सकारात्मक विचार, संघ रचना, ध्येय निश्चिती, गट चर्चा, मूल्य शिक्षण, व्यक्तीमत्व विकास, इंग्रजी संवाद कला कौशल्य आदी विषयांवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नुपूर जोशी यांनी केले. आभार सागर सोनवणे यांनी मानले.