विदर्भातील औद्योगिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा असूनही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात पुरेसे अधिकारी, कर्मचारी नसल्याने कामगारांना वेळेवर न्याय मिळत नाही, याची प्रांजळ कबुली देताना येत्या मार्चनंतर या कार्यालयात पुरेसे कर्मचारी नियुक्ती करण्याचे आश्वासन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
 कामगार सेल राष्ट्रवादीच्या वतीने केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस सप्ताहाच्या निमित्ताने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा कामगारांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेण्याकरिता लोकसेवा मंगल कार्यालय पडोली येथे आयोजित कामगार दरबारात ते बोलत होते. या दरबाराला कामगार मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, कार्याध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, अ‍ॅड. मोरेश्वर टेंमुर्डे, अनुराधा जोशी, ज्योती रंगारी, हिराचंद बोरकुटे, राजेंद्र आखरे, बाळू बिसेन, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मोहोड उपस्थित होते. या दरबारात समस्या मांडण्याकरिता गुप्ता कोल वॉशरीज, गोपानी आयर्न, माथाडी कामगार, वर्धा पॉवर, जीएमआर, सीटीपीएस, धारीवाल, पंज लॉयड व विविध कंपन्यांचे सुमारे १२०० कामगार हजर होते.
विविध कंपन्यातून आलेल्या कामगारांनी निवेदने व समस्या मंत्र्यांपुढे मांडल्या. मंत्र्यांनी सर्वाचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्व निवेदनांचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी मुश्रीफ यांनी कंपनी वा कंपनीचा मालक कितीही मोठा असला तरी तो कायद्यापुढे मोठा नाही, हे सांगत असतांनाच गोपानी आयर्न कंपनीच्या कामगारांच्या समस्येवर लगेच उपस्थित अधिकाऱ्यांना कंपनीचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, तसेच पोलिसांना केवळ लॉ आणि ऑर्डर कळतो. कामगारांचे अधिकार व त्यांचे कायदे त्यांना माहीत नाही. आर. आर. पाटलांना भेटू व पोलिसांना कामगार कायद्याचे शिक्षण द्यावे, अशी विनंती करू, असे प्रमोद मोहोड यांना उद्देशून ते म्हणाले. कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता माझ्या मंत्रालयाचे दार केव्हाही उघडे आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रमोद मोहोड यांनी, तर संचालन संजय वैद्य यांनी केले. प्रमोद मोहोड, प्रदीप ढाले, सी. आर. टेंभरे, के. बी. चौधरी, विकास विरूटकर उपस्थित होते.