शहरातील सर्वच रस्त्यांची लहान-मोठय़ा खड्डय़ांमुळे मोठी दुर्दशा झाली असून खड्डे चुकवताना नागरिक व वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. खड्डय़ांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी विविध पक्षांकडून आंदोलनांचा सपाटा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यात उतरली असून खड्डय़ांचे छायाचित्र प्रदर्शन भरवून महापालिकेचे पितळ उघडे पाडले. सिडकोतील वसंतराव नाईक चौकात हे अभिनव आंदोलन आयोजित केले होते.
मनसेतर्फे गेल्या महिनाभरापासून शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत आंदोलन केले जात आहे. मात्र, कुंभकर्णाची झोप घेतलेल्या महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे हे प्रदर्शन भरवून नागरिकांच्या सह्य़ांची मोहीम शनिवारी राबविण्यात आली. सह्य़ांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने हालचाली न केल्यास या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब डांगे यांनी दिला. अॅड. गणेश वानखेडे, शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, पूर्व विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर डांगे, संतोष पाटील, आशिष सुरडकर यांची उपस्थिती या वेळी होती. अजय गटाणे, रवी गायकवाड, सचिन ठोंबरे, अमोल कोरडे, अंकुश काळे, महिला आघाडीच्या लीला राजपूत, मंजू देशमुख, ज्योती बोहरे, सुनीता साळुंखे, सविता कदम, रुपाली पवार आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.