वडाळा ते चेंबर दरम्यान सुरू झालेल्या मोनो रेलबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यावरून पालिका सभागृहात गुरुवारी मानापमान नाटय़ रंगले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या. तब्बल दोन तास झालेल्या चर्चेनंतर त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
मोनो रेल सुरू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सभागृहात निवेदन सादर केले होते. मोनोच्या उद्घाटनाचे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तोंड भरून कौतुक केले. तर शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकेला साधे उद्घाटनाचे आमंत्रणही देण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही, अशी टीका शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली.
मोनोवर टीका करताना भाजपच्या दिलीप पटेल यांना गुजरातची आठवण झाली. गुजरातप्रमाणे मुंबईतही बीआरटीएस प्रकल्प राबविण्यासाठी एक हजार कोटी रुपये द्या, अशी मागणी त्यांनी केली. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाला झालेला विलंब, टोलवसुली, शालेय शिक्षणाबाबत उदासीन असलेल्या राज्य सरकारविरोधात तोफ डागली. मोनो रेल प्रकल्पात ३८३ मीटरचा रस्ता बदलण्यात आला असून त्यामुळे १०० कोटी रुपयांचा भरुदड पडला आहे.
हा प्रकल्प सुरू होण्यास चार वर्षे विलंब झाला आहे. या प्रकल्पात घोटाळा झाल्याचा संशय असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली. कवडीच्या भावात जमीन मिळत असलेल्या ठिकाणी मोनो रेल प्रकल्प राबवून सरकारने बिल्डरांना मदत केल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांनी केला.
मोनो रेल पाहण्यासाठी पर्यटक आता मुंबईत येतील, असे वक्तव्य काँग्रेसच्या नगरसेवकांनी केल्यामुळे सत्ताधारी नगरसेवक भडकले. ‘आदर्श’ इमारत पाहण्यासाठी आणि डोक्यावर पडलेले सरकार पाहण्यासाठी पर्यटक येथे येतील, असा टोला हाणत शिवसेना नगरसेवकांनी सरकारची खिल्ली उडविली.