रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी उन्हातान्हात घाम आणि रक्तही आटवणाऱ्या रेल्वेच्या गँगमनना सध्या मध्य रेल्वेने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. अपुरा कामगार वर्ग, कंत्राटी पद्धत, त्यातून होणारे अपघात यामुळे रेल्वेमार्ग गँगमनच्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. गेल्या चार वर्षांत रेल्वेमार्गावर ३७५ हून जास्त गँगमनचा बळी गेला आहे. गँगमनची अपुरी संख्या आणि परिणामी सुरक्षेतील हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. मात्र गँगमननी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असा अनाहूत सल्ला रेल्वे व्यवस्थापनाने दिला आहे.
रुळांची देखभाल आणि दुरुस्ती करणारे गँगमन रेल्वेसेवेचा कणा मानले जातात. रविवारी मेगाब्लॉकच्या नावाखाली चालणाऱ्या ‘महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी’ कामापासून ते रोज रुळांची तपासणी करण्यापर्यंत हे गँगमन उन्हपावसात काम करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक ‘गँग’मधील या गँगमनची संख्या अतिशय रोडावली आहे. या गँगमनच्या अनेक जागा रिक्त असून त्यांच्या सुरक्षेसाठी घ्यावी लागणारी काळजी रेल्वे प्रशासन घेत नाही, असा आरोप ‘एनआरएमयू’तर्फे करण्यात येत आहे.
गँगमन एकेका गँगमध्ये ठरावीक हद्दीत काम करतात. पूर्वी एका गँगमध्ये किमान ४० ते कमाल ५५ गँगमन असत. त्यामुळे कामाच्या ठिकाणाहून दोन्ही बाजूंस ठरावीक अंतरावर हातात बावटा घेऊन एक-एक गँगमन उभा केला जात असे. या दोन गँगमनच्या पुढे काही अंतरावर दोन्ही बाजूंस एक-एक गँगमन शिटी घेऊन उभा असे. कोणत्याही बाजूने गाडी येत असल्यास शिटीवाला गँगमन त्वरीत सूचना देत असे. त्याची सूचना मिळाल्यानंतर बावटेवाला गँगमन धोक्याचा बावटा दाखवत असे आणि गँगमन काम थांबवून सुरक्षित ठिकाणी जात.
मात्र मध्य रेल्वेवर लाकडी स्लिपर्सऐवजी सिमेंट काँक्रिटचे स्लिपर्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काम कमी झाले, असे सांगत गँगमनची संख्या कमी करण्यात आली. ही संख्या सध्या एका गँगमध्ये किमान ८ ते कमाल १५ एवढी कमी आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी चार चार माणसे नेमणे गँगला शक्य होत नाही. परिणामी गँगमनना होणाऱ्या अपघातांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गँगमन म्हणून नेमले गेलेले बरेच लोक रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी त्यांची खासगी कामे करण्यात व्यग्र असतात, असा आरोप एनआरएमयूतर्फे करण्यात आला. देशभरात गँगमनची संख्या अडीच लाखांच्या आसपास असून त्यापैकी ४७ हजार गँगमन ‘साहेबा’च्या घरी राबतात, असे सांगितले जाते.
गँगमनच्या वाढत्या अपघातासाठी कंत्राटी पद्धतही जबाबदार असल्याचे काही गँगमनचे म्हणणे आहे. रेल्वेची व्यवस्था समजून घ्यायला रेल्वेमध्ये काही वर्षे काढावी लागतात. मात्र सध्या रेल्वे प्रशासन कंत्राटी कामगार नेमून गँगमनची कामे करून घेत आहे. या मजुरांना रेल्वेची माहिती नसते. त्यामुळेही अनेकदा अपघात होतात.
गेल्या आठवडय़ात रेल्वेमार्गावर दोन ठिकाणी गँगमनचे अपघात झाले. यापैकी उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान झालेल्या अपघातात एका गँगमनचा जागीच मृत्यू झाला, तर एक गँगमन गंभीर जखमी झाला. त्याला सहा तास उपचारही मिळाले नाहीत, असा आरोप एनआरएमयूने केला आहे. तर दुसऱ्या अपघातात शीव आणि माटुंगा या स्थानकांदरम्यान एका गँगमनला रेल्वेची धडक लागून तो जखमी झाला.
रेल्वेमार्गावर काम करणे खरोखरच जिकिरीचे आहे. त्यामुळे गँगमननी काम करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. रेल्वे गँगमनसाठी काळजी घेतच असते. मात्र व्यावसायिक धोकेही आहेत. ते गँगमननाच पाहावे लागतात. आम्ही आता गँगमनचे समुपदेशन करणार आहोत. त्याचप्रमाणे रिक्त पदांसाठी भरतीही लवकरच केली जाईल.
मुकेश निगम, वरिष्ठ विभागीय रेल्वे संचालक