उल्हास नदीतील पाण्याची पातळी घसरल्याने ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू झाली असली तरी जलश्रीमंतीचे बिरुद मोठय़ा मानाने मिरवणाऱ्या नवी मुंबईत मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे पाण्याची अक्षरश नासाडी सुरु असल्याचे चित्र पुन्हा पुढे येऊ लागले आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे ३० हजार लिटर पाणी वापरावर अवघे ५० रुपयांचे बिल असा लोकप्रिय निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असला तरी त्यामुळे शहरातील पाणी वापर प्रती माणशी ३५० लिटरवर पोहचला आहे. यामुळे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी अस्वस्थ झाले असून आयुक्त भास्कर वानखेडे यांनी व्यावसायीक वापर तसेच मर्यादेपेक्षा अधिक पाणी वापर करणाऱ्या रहिवाशांना जादा पाणीबिल आकारता येईल का, याची नव्याने चाचपणी सुरु केली आहे.
राज्याच्या पाटबंधारे विभागाने बारवी धरणातून पाणी उचलणाऱ्या वेगवेगळ्या प्राधिकरणांसाठी सोमवारपासून १५ टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईदर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर अशा जिल्ह्य़ातील शहरी भागांमध्ये तेथील स्थानिक प्राधिकरणांनी पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवलीसारख्या शहरात आठवडय़ातील प्रत्येक बुधवारी त्या-त्या शहरातील पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्य़ातीलस इतर शहरांमध्ये अशी परिस्थीती असताना नवी मुंबईत मात्र मोरबे धरणातील पाणीसाठय़ाच्या जोरावर पाण्याची अक्षरश उधळपट्टी सुरु असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबईनंतर स्वतच्या मालिकेचे धरण असलेली राज्यातील एकमेव महापालिका म्हणून नवी मुंबई ओळखली जाते. खालापूर तालुक्यातील मोरबा नदीवर उभारण्यात आलेल्या मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा आहे. या धरणातील पाण्याची पातळी ४५० दक्षलक्ष लिटर इतकी असून नवी मुंबई या एकमेव शहराला या धरणातून पाण्याचा पुरवठा होत असतो. स्वतच्या मालकिचे धरण असल्याने नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांनी पाणी वापरासंबंधी लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका लावला असून यामुळे पाण्याची मोठय़ा प्रमाणावर नासाडी सुरु असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. नवी मुंबईतील सिडको वसाहतींमध्ये सुमारे ५२ हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे. या वसाहतींमध्ये रहाणाऱ्या रहिवाशांनी महिन्याला ३० हजार लिटर पाणी वापरले तर त्यांना अवघे ५० रुपयांचे बिल आकारले जाईल, असा धोरणात्मक निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. ३० हजार लिटर पाणी वापरावर प्रती लिटर ४ रुपये ५० पैसे या दराने बिलाची आकारणी केली जाते. या धोरणामुळे पाण्याचा वापर प्रचंड वाढला असून शहरात प्रती माणसी ३५० लिटर इतके पाणी वापरले जाते, अशी माहिती महापालिकेतील अभियंता विभागातील वरिष्ठ सुत्रांनी वृत्तान्तला दिली. मुंबई शहरात प्रती माणसी १०० लिटर तर ठाण्यात १७० लिटर असा पाण्याचा सरासरी वापर होतो आहे. डोंबिवली, अंबरनाथ, बदलपूर, मीरा-भाईदर यासारख्या शहरांमध्ये प्रती माणसी १५० लिटर पाणीही नशीबी येत नाही. असे असताना मोरबे धरणाच्या जोरावर नवी मुंबईत सुरु असलेला ३५० लिटर पाण्याचा वापर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अस्वस्थ करु लागला आहे. यामुळे येत्या काळात व्यावसायीक तसेच ३० हजार लिटरपेक्षा अधिक वापर करणाऱ्या रहिवाशांना जादा बिल आकारता येईल का, याची चाचपणी आयुक्त वानखेडे यांनी सुरु केली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीतील नेत्यांना आग्रह लक्षात घेता वानखेडे असा धाडसी प्रस्ताव मांडतील का, याविषयी मात्र महापालिका वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे.