महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्हीही परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने त्या दिवशीचा पेपर पुढे ढकलावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा व विद्यापीठाची परीक्षा येत्या १८ मे रोजी होऊ घातली आहे. सकाळी ९.३० ते १२.३० आणि दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत विद्यापीठाची परीक्षा राहील तर दुपारी ११ ते एक आणि दुपारी दोन ते चार असे राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर आहेत. खरे तर राज्य सेवा पूर्व परीक्षा गेल्या सात एप्रिलला होणार होती. त्या दिवशी पदव्युत्तर राज्य शास्त्र, मात्र संगणकीय तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली व नंतर ती १८ मे रोजी होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले. दरवेळी रविवारी होणारी ही परीक्षा यावेळी मात्र आयोगाने शनिवारी ठेवली आहे. एप्रिल-मे महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा असतात हे माहिती असूनही आयोगाने तो विचार न करता परीक्षा शनिवारी आयोजित करून आमची गैरसोय केल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. विद्यापीठ परीक्षा घेताना आयोगाच्या परीक्षा, नेटसेट किंवा इतर प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकाचदिवशी येऊ नयेत, याची खबरदारी विद्यापीठ दरवेळीच घेत असते. विद्यापीठाचे वेळापत्रक अगोदर घोषित झाले तर आयोगाने नंतर परीक्षेची तारीख घोषित केल्याने आता विद्यार्थ्यांपुढे नेमकी कोणती परीक्षा द्यावी, असा प्रश्न आहे.
एमएच्या दुसऱ्या सत्राच्या इंग्रजी(दी इंग्लिश नॉवेल-१), मराठी(अर्वाचीन मराठी गद्य मराठी वैचारिक निबंध-२), हिंदी(आधुनिक हिंदी साहित्याचा इतिहास), उर्दू(क्लासिकल पोएट्री), अर्थशास्त्र(सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण-२), इतिहास(इतिहासाचा कल आणि सिद्धांत), राज्यशास्त्र(भारतीय प्रशासन), लोकप्रशासन(लोकप्रशासनाचा सिद्धांत), भूगोल(रिसर्च मेथडॉलॉजी), समाजशास्त्र(क्लासिकल थेअरॉटिकल फाउंडेशन), महिलांचा अभ्यास(भारतातील महिलांचे अधिकार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा(सामाजिक विचार), गांधी विचारधारा(बेसिक वर्क्‍स ऑफ महात्मा गांधी-२), गृह विज्ञान(सिसोर्स मॅनेजमेंट), बुद्धिस्ट स्टडीज(भारतातील बौद्ध विचार इतिहास), तत्त्वज्ञान(वेस्टर्न इथिक्स), मानसशास्त्र(अद्ययावत सामान्य मानसशास्त्र), प्रवास आणि पर्यटन(रिलिजिअस आणि कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ इंडिया) इत्यादी विषयांच्या पेपर्सबरोबरच अरेबिक, पर्शियन, संस्कृत, पाली, लिंग्विस्टिक याविषयांचा ‘क्लासिकल प्रोझ’ या विषयाची परीक्षाही १८ मे रोजी होणार आहे. याशिवाय गणित-३, बीए प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तिसऱ्या वर्षांतील काही परीक्षाही याच दिवशी आहेत. याशिवाय मास्टरऑफ फाईन आर्ट प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षाही याच दिवशी होणार असल्याने विद्यापीठाचे संपूर्ण वेळापत्रकच बदलणे विद्यापीठाला फारच अडचणीचे जाणार आहे.