नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कारभाराबाबत गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बठकीत सदस्यांनी शिक्षणधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरले. नगरसेवक सुरज पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रभागांतील इंग्रजी माध्यमांच्या वर्गाना शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षिणक नुकसानाबाबतचा विषय मांडला होता. यावर उपआयुक्त जग्गनाथ सिन्नरकर यांनी आयुक्तांबरोबर चर्चा करून शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात त्यांच बरोबर शिक्षकांच्या वाढीव पगारासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सदस्यांना सांगितले.
महापालिकेच्या माध्यमातून शिक्षण मंडळाने  शहरात चांगल्या दर्जाच्या शाळा उभारल्या आहेत. या शाळांची उभारणी करत असताना मराठी माध्यमांबरोबरच इंग्रजी माध्यमांच्यादेखील शाळा सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. सर्व समान्य घरातील मुलांना आधुनिक दर्जाच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण देण्यात येते. मात्र या शाळेत शिक्षकांची संख्याच कमी असल्याचे सदस्यांनी शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले आहे. नगरसेवक सुरज पाटील यांनी त्यांच्या प्रभागातील शाळेत इंग्रजी माध्यमांचे वर्ग शिक्षकाअभावी सुरू नसल्यांची बाब समोर आणली. स्थायी समितीच्या सदस्यांनीदेखील ही बाब चर्चेत आणली. या चर्चेत नगरसेवक शिवराम पाटील, नगरसेवक मनोज हळदणकर, त्याचबरोबर महिला लोकप्रतिनिधीनी शिक्षण मंडळांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षकांना जर तुटपुंजा पगार असेल तर चांगले शिक्षण कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेच्या शाळांमध्ये मानधन तत्त्वावर असणाऱ्या शिक्षकांना १२ हजार रुपये पगार करण्याचे निर्देश तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले होते. मात्र शैक्षणिक वर्ष अध्रे संपत आलेले असताना त्याची अंमलबजावणी झाल्याची कैफियत नगरसेवक शिवराम पाटील यांनी मांडली तर नगरसेवक सुरज पाटील यांनी उपस्थित केलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांच्या भरतीच्या मूळ प्रश्नावर प्रशासनाच्या वतीने उपआयुक्त सिन्नरकर यांनी आपली भूमिका मांडली. शासनाकडे शिक्षक भरतीचा प्रस्ताव अजून मंजूर झाला नसल्याने त्याचबरोबर पदनिर्मिती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक भरती झाली नसल्याचे स्पष्ट केले. तर पाटील यांच्या प्रश्नावर विशेष बाब म्हणून तीन महिन्यांच्या कालावधीकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यासंदर्भात आयुक्तांशी तत्काळ चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. एकंदरीतच नवी मुंबई शहरात शिक्षणांची दारे जरी खुली झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यात विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक, गुरुजनवर्ग नसल्याने शिक्षण मंडळाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.