जिल्हय़ातील पुरजळ व सिद्धेश्वर संयुक्त पाणीयोजना वीजदेयक न भरल्याने या दोन्ही प्रादेशिक पाणीयोजना बंद आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेतले.
पुरजळ योजनेतून २० गावांना, तर सिद्धेश्वर योजनेतून २६ गावांना पाणीपुरवठा होतो. या योजनांची वीज थकीत देयकामुळे खंडित केली आहे. पाणीप्रश्नी उपोषण केल्यावर प्रशासनाने पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता एंबडवार यांना उपोषणस्थळी पाठविले. पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यावर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. वीज वितरण कंपनीला २ लाख ९७ हजार रुपयांचा धनादेश वीजदेयकापोटी दिला असल्याचे एंबडवार यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले