जुन्या वैमनस्यातून मारेकऱ्यांनी तीक्ष्ण व धारदार शस्त्राने भोसकून एका तरुणाची हत्या केली. मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरवरील शिवाजीनगरातल्या बास्केटबॉल मैदानाजवळ घडलेल्या या घटनेने तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहरात गुन्हेगार, मारेकऱ्यांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे उघड झाले आहे.
रितेश रमेश बैसवारे हे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो आमदार निवासामागील वसाहतीत राहतो. अमरावती मार्गावरील विद्यापीठ विधि महाविद्यालयासमोर त्याचे कपडय़ांचे दुकान आहे. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे शिवाजीनगरातील बारबेरिअन जीममध्ये जात होता. जीमजवळच मारेकऱ्यांनी त्याला घेरले आणि एकाने तीक्ष्ण व धारदार शस्त्राने भोसकले. रितेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहून मारेकरी पळून गेले. ते दिसताच रितेशचे परिचित धावले. त्यांनी रितेशला लगेचच वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त वसंत आडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांच्यासह अंबाझरी पोलीस तेथे पोहोचले. उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविला. अनोळखी आरोपींविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण ताब्यात घेतले. त्यात चार मारेकरी दिसत असले तरी ते अस्पष्ट आहेत. मारेकरी त्याच्या मागावर होते आणि काही वेळापूर्वी ते तेथे दबा धरून बसले होते. त्याच्या डोळ्यात मारेकऱ्यांनी तिखड फेकले व मग भोसकले. काही महिन्यांपूर्वी एका मुलाला रितेश व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. त्या परिसरातील एका तरुणाशी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. भर रस्त्यावर झालेल्या या घटनेने त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि आप्तेष्ट रुग्णालयात पोहोचले. त्याची हत्या कुणी व कशासाठी केली, हे स्पष्ट झाले नव्हते.
या घटनेनंतर जी.एस. कॉलेज चौकात तणाव निर्माण झाला. तेथील दुकाने सकाळी काहीवेळ बंद होती. रितेशच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. रितेशला दोन मोठे भाऊ असून तो अविवाहित होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी धरमपेठेतील सुदामा टॉकीजमागील गल्लीत कोल माफिया टन्नू उर्फ शागीर सिद्दिकीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आच शिवाजीनगरात घटना घडली. मुख्यमंत्र्यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.