बहुप्रतीक्षित मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होऊ घातले असून पाच ते साडेपाच वर्षांंत तो पूर्ण होईल, असा विश्वास नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांनी व्यक्त केला. नासुप्र या प्रकल्पाची नोडल एजंसी असून डिसेंबर २०१० मध्ये या प्रकल्पाचा विचार झाला तेव्हापासून ते सतत याचा पाठपुरावा करीत आहेत.
सुमारे ८ हजार ६८० कोटी रुपये प्रस्तावित खर्चाचे मेट्रो रेल्वेचे नागपुरात दोन मार्ग राहणार असून त्यात केंद्र शासनाचा २० टक्के (१ हजार ७३६ कोटी रुपये), राज्य शासन २० टक्के (१ हजार ७३६ कोटी रुपये), नागपूर महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास ५ टक्के (प्रत्येकी ४३४ कोटी रुपये), कर्ज वा इतर स्त्रोतांद्वारे ५० टक्के (३४० कोटी रुपये), असा एकूण ८ हजार ६८० कोटी रुपये निधी उभारला जाणार आहे. हे मार्ग अनुक्रमे १९.६५८ व १८.५५७, असे एकूण ३८.२१५ किलोमीटर लांबीचे असतील. दिल्ली रेल्वे मेट्रो कार्पोरेशनने २०१२ मध्ये या मेट्रोसंदर्भात सखोल अभ्यास केला आहे.
कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह ते मिहान या मार्गावर (उत्तर-दक्षिण मार्गिका) नारी रोड, इंदोरा, कडबी चौक, गड्डीगोदाम, कस्तुरचंद पार्क, शून्य मैल, सीताबर्डी, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, नीरी, देवनगर, सहकारनगर, जुने विमानतळ, नवीन विमानतळ, मिहान व मेट्रो डेपो हे थांबे राहतील. प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर (पूर्व-पश्चिम मार्गिका) हा दुसरा मार्ग राहणार असून त्यावर प्रजापतीनगर, वैष्णव देवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्स्चेंज, चितार ओळ, अग्रसेन चौक, मेयो रुग्णालय, रेल्वे स्थानक, नेताजी मार्केट, झाशी राणी चौक, शंकरनगर, एलएडी चौक, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, सुभाषनगर, वासुदेवनगर, बन्सीनगर व लोकमान्यनगर हे थांबे राहतील. हे दोन्ही मार्ग दुहेरी राहणार असून त्या सर्वाचे काम एकाच वेळी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. दोन्ही मार्गावर प्रत्येकी १९ थांबे राहतील. मुंजे चौकात त्यांचे जंक्शन राहील.
या दोन्ही मार्गासाठी मध्यवर्ती कर सोडून एकूण ६ हजार ५५२ कोटी रुपये, तर मध्यवर्ती करासह एकूण ७ हजार ३५० कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. प्रति किलोमीटर २२६ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. अंतिम किंमत ९ हजार ७ कोटी रुपये होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१४ मध्ये काम सुरू करून २०१९-२० मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी २० टक्के, तसेच खाजगी कर्जरूपाने या प्रकल्पासाठी रक्कम उभी करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी हिंगणा मार्ग, तसेच दोन-तीन ठिकाणी जागा घ्यावी लागणार आहे. रस्त्याच्या मध्यभागी दहा मीटर उंचीवर मेट्रो राहील. आवश्यक तेथे उंची वाढविली जाणार आहे. मुंजे चौकात दोन्ही रेल्वे क्रॉस होतील. काही ठिकाणी भूमिगत मार्ग करण्याचा विचार होता. मात्र, त्यासाठी अडीचपट खर्च येणार असल्याने हा विचार सोडून देण्यात आला.
या प्रकल्पाच्या निधी परताव्यासाठी मेट्रो तिकिटाचे उत्पन्न, जाहिरातींद्वारे उत्पन्न, महापालिका विकसन शुल्कात वाढ, महापालिका हद्दीत स्टँप डय़ुटी व रजिस्ट्रेशनवर अधिभार, मेट्रो मार्गिका प्रभावित ५०० मिटर क्षेत्रातील घनीकरणासाठी वाढीव चटई क्षेत्रफळ निर्देशांक, मेट्रो डेपो व स्थानकाच्या व्यापारी विकसनाद्वारे निधी, आदी मार्गाने केला जाणार असून हे स्त्रोत व प्रकल्पातील गुंतवणूक विचारात घेता वित्तीय परतावा १०.३५ टक्के होणार आहे. कंपनी कायद्यानुसार स्पेशल पर्पज व्हेईकलची स्थापना करण्यात आली आहे. मेट्रोत स्टेनलेस स्टिलचे वातानुकुलित डबे राहतील. स्वयंचलित व स्मार्ट कार्डद्वारे तिकीट व्यवस्था राहील. स्थानकांवर लिफ्ट, सरकते जिने व साधे जिने राहतील. प्रारंभी तीन डबे राहणार असून त्यातून एकूण ७६४ प्रवासी बसू शकतील. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविली जाणार असल्याचे दराडे म्हणाले. नासुप्रचे कार्यकारी अभियंता (मेट्रो) आनंदकुमार याप्रसंगी उपस्थित होते.

नागपूर शहरात सध्या बारा लाख वाहने रस्त्यावर धावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. आजची स्थिती आणि भविष्याचा विचार करता मेट्रो रेल्वेची गरज निर्माण झाली आहे. इतर वाहनांच्या तुलनेत स्वस्त, सर्वाधिक प्रवासी वाहून नेणारी तसेच कमी वेळेत अंतर कापणारी असल्याने मेट्रो रेल्वे नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचीच ठरणार आहे. मेट्रो रेल्वेमुळे शहराच्या विकासाला गती येईल. मोठ-मोठे उद्योग येतील. औद्योगिक गुंतवणूक वाढेल. रोजगारही वाढेल. नागपूर शहर जागतिक दर्जाचे शहर होईल, या शब्दात मेट्रोचे महत्त्व प्रवीण दराडे यांनी व्यक्त केले.