बदलत्या जीवनशैलीत सर्वच क्षेत्रात बदल झालेले असताना बालरोगशास्त्रही त्याला अपवाद नाही. आताची उपचार पद्धत सोपी, बालक केंद्रित आहे. मात्र, पूर्वी औषधे देताना ‘बालक म्हणजे माणसाची लहान प्रतिकृती’ या समजातून ती दिली जायची. मोठा माणूस व बालकाच्या वयाच्या गुणोत्तरानुसार औषधाचे प्रमाण ठरवले जायचे, असे अनुभव बालमानसशास्त्राचे जाणकार व बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत कथन केले.
डॉ. चोरघडे यांनी वयाची पंच्याहत्तरी आणि वैद्यकीय व्यवसायाची पन्नाशी नुकतीच पूर्ण केली असून बदलते बालमानस आणि त्यानुषंगाने उपचारात कराव्या लागणाऱ्या बदलाची माहिती त्यांनी दिली. आजची औषधे पचायला हलकी, मुलांच्या चवीचा विचार करून दिली जाणारी असल्याने बालकांची शारीरिक दुखण्यांवर मात करता येते. शिवाय, कॉलरा, गालगुंड, क्षयरोग, धनुर्वात, गोवर आदींच्या साथींमुळे ओढवणारा बालमृत्यूदर समाजातील जागृती आणि लसीकरणामुळे आटोक्यात आला. आता तंतोतंत निदान शक्य होते. लोकसंख्येच्या तुलनेत उपचारात नेमकेपणा, डॉक्टर आणि रुग्णही वाढल्याचे डॉक्टरांनी मिश्किलपणे सांगितले.
बालकांच्या नियमित तपासणीतून काही आजार टाळता येऊ शकतात, हे सरावांती लक्षात आले. ‘डॉक्टरांकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते’ याचा रुग्णाबरोबरच त्याच्या पालकांवरही सकारात्मक प्रभाव पडल्याने ते त्यांच्या अडीअडचणीही सांगू लागले. त्यातून वर्तनाधारित बालमानसशास्त्र लक्षात आले. तोपर्यंत बालमानसशास्त्राला धरून उपचार केले जात नव्हते, असे चोरघडे म्हणाले.
मुलांवरही घरातील परिस्थितीचा तणाव असतो आणि प्रत्येकाची ताण सहन करण्याची शक्ती वेगळी असते. शारीरिक असंतुलनामुळे तणाव वाढतो. त्यामुळे हल्लीच्या धकाधकीत प्रत्येकाने ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. आपल्याकडे बालकांचे शास्त्रीय समुपदेशन नाहीच्या बरोबर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘अडगुलं-मडगुलं’ या पुस्तकाच्या ११व्या आवृत्तीविषयी बोलताना ते म्हणाले, वाचणारे लोक असतात आणि त्याचा फायदा होतो, हे या पुस्तकावरून कळले. मुलांमधील ‘भावनिक बंध’ कमी होत असून त्यात कुठेतरी पालकही जबाबदार आहेत. सामाजिक सौहाद्र्र जपणे, भागीदार करून घेणे ही प्रक्रिया मंदावण्यात पालकही दोषी असतात. युवावर्गात आत्मकेंद्रितपणा वाढला आहे.