नैरोबीतील वेस्टगेट मॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील मॉलमधील सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त के.के. पाठक लवकरच मॉलच्या मालकांसोबत बैठक घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईतील मॉल्समधील सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांवर नागपूमधील मॉल कमी पडत असल्याचे चित्र असल्याने एखादी अनुचित घटना घडण्याची भीती वर्तविली जात आहे.
मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणे, खाजगी सुरक्षा रक्षकांना स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण देणे, प्रत्येक वाहन, मालवाहतूक करणारी वाहने यांची तपासणी करणे, सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करून त्याचे फुटेज ३० दिवसपर्यंत कायम राहील, याची व्यवस्था करणे, सशस्त्र सुरक्षा रक्षकांची तैनाती, ध्वनिक्षेपकांची व्यवस्था आणि आणबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्याच्या व्यवस्थेबाबतची सूचना देणे, मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फेरतपासणी करणे, एखाद्या दुर्घटनेची चाहूल लागल्यास अलार्म वाजण्याची व्यवस्था करणे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर सुरक्षेचा स्तर अवलंबून आहे. मुंबईत अलीकडेच राबविण्यात आलेल्या एका ऑपरेशनमध्ये सर्वच मॉलमधील सुरक्षेची चाचपणी करण्यात आली. यात अनेक त्रुटी आढळल्याने किमान २० निकषांवर मॉलच्या सुरक्षेची पडताळणी करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या निकषांवर अपयशी ठरणाऱ्या मॉलचा परवाना रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात एम्प्रेस मॉल, पूनम मॉल, नागपूर शॉपिंग मॉल, विशाल मेगामार्ट, बिगेस्ट मॉल, जसवंत तुली मॉल, इटर्निटी मॉल, बुटी पॅलेस मॉल, फूड बाजार, पुनीत सुपर बाजार, संजय ट्रेडर्स, बिग बझारचे तीन मॉल असून सुटीच्या दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च उपाय करणे अनिवार्य ठरणार आहे.