डोंबिवली शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. या नागरीकरणामुळे शहरालगतची गावे शहराला जोडण्यात येत आहेत. नागरीकरण होत असलेल्या भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू  आहेत. काही ठिकाणी सोसायटय़ा उभारण्यात येत आहेत. मात्र अंतर्गत रस्ते विकासक, ग्रामपंचायत बांधत नसल्याने या भागातील रहिवाशांना खड्डे, चिखलमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे.
अशातच नांदिवली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून एक वृध्दास रूग्णवाहितेतून नेत असताना ती खड्डय़ात रूतल्याने जीव गमवावा लागल्याची दुर्घटना घडली. या अनधिकृत बांधकामे, दुर्दशा झालेले
रस्त्यांबाबत नांदिवली येथील रहिवासी संजय देसले यांनी गृहमंत्री ते जिल्हाधिकारी स्तरापर्यंत गेल्या वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. देसले यांच्या वयोवृध्द वडिलांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना रूग्णवाहिकेतून रूग्णालयात नेण्यात येत होते. मात्र एकतानगरमधील खड्डेमय रस्ते व त्यामधील चिखलात वाहिका अडकून पडली. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने वडिलांचे निधन झाल्याची संजय देसले यांची तक्रार आहे.
स्थानिक सोसायटी मालक, विकासक यांच्या विरूध्द त्यांनी विविध थरावर तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या पत्राची कोणीही दखल घेत नसल्याने त्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. नांदिवली ग्रामपंचायत हद्दीतील एकतानगरमधील विघ्नेश कृपा सोसायटीतील रहिवासी संजय देसले यांनी या सर्व समस्यांबद्दल शासनाला पत्रे लिहिली आहेत. त्यांच्या घरापर्यंत मुख्य रस्त्याला जोडणारा एक पोहच रस्ता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. या बांधकामांच्यामधील रस्ता ग्रामपंचायत, विकासक करीत नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या भागात अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या बांधकामांवर, एन. ए. भूखंडधारकांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. ग्राम विकास अधिकारी नितीन चव्हाण यांनी सांगितले, सदर रस्ता ग्रामपंचायत हद्दीमधील नसून त्यावर मालकी हक्क आहे. कोणत्याही जमीन मालकाने रस्ता दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतीला पत्र दिले नाही. रस्ता दुरूस्ती पंचायतीकडून होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.