लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका संपल्या तरी भाजपचे कार्यकर्ते अजूनही प्रचाराच्या हवेत आहेत. मकर संक्रांतीनिमित्त आयोजित पतंग महोत्सवातही कल्याणमधील भाजप कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रसिद्धी करण्यात आघाडीवर होते. कल्याण शहर पतंग महोत्सव समितीच्या वतीने कल्याण येथील गणेशघाटावर पतंग महोत्सव २०१५ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला चार वर्षांच्या मुलांपासून ऐंशी वर्षांच्या आबालवृद्धांपर्यंत अनेकजण मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले होते.
तसेच शहरातील सहा शाळांमधील विद्यार्थ्यांनीही या महोत्सवाला भेट देत मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. या महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेले पतंग मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळाले. तसेच मोदी व अमेरिकेचे ओबामा यांची भेट असलेले चित्रही पतंगावर झळकले होते. यासोबतच लहान मुलांसाठी विविध काटूर्न्‍स तसेच ४ फुटी चिनी पतंग पाहावयास मिळाले.
लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या हंगामात भाजपने आपल्या पक्षाची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रसिद्धी करण्याची कमतरता कोठेही जाणवू दिली नाही. प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर करीत त्यांनी मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी केली. या निवडणुका संपल्या असल्या तरी मोदी फीव्हर कमी होताना दिसत नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मोदी यांची पुन्हा जोरदार प्रसिद्धी भाजपच्या वतीने सुरू झाली आहे. त्याचीच सुरुवात पतंग महोत्सवात दिसून आली.
समितीचे अध्यक्ष चिंतन जोशी म्हणाले, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, मात्र समितीच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सर्वधर्मसमभाव व अनेकता मे एकता हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. नागरिकही याला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद देत असल्याने त्याचाही एक आनंद आम्हाला आहे.