News Flash

निवडणुकीच्या रणधुमाळीत नरेश पुगलिया यांचे ‘थांबा आणि वाट पहा’

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असली तरी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया गटाने सध्या शांत राहणेच पसंत केले आहे.

| March 27, 2014 10:59 am

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असली तरी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया गटाने सध्या शांत राहणेच पसंत केले आहे. आक्रमक नेते, अशी ओळख असलेल्या पुगलिया यांच्या ‘वेट अॅन्ड वॉच’ भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघासाठी येत्या १० एप्रिलला मतदान होणार आहे. अवघ्या दोन आठवडय़ावर निवडणूक आल्याने महायुतीचे हंसराज अहीर, कॉंग्रेस आघाडीचे संजय देवतळे व आपचे अॅड.वामनराव चटप प्रचारात गुंतले आहेत. सर्वत्र निवडणुकीच्या चर्चेला पेव फुटले असतांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया शांत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत पाठराखण केल्याने शेवटच्या क्षणी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या गळय़ात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे पुगलिया नाराज झाले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले पुगलिया तातडीने चंद्रपूरला परत आले आणि स्वत:च्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली, तसेच उमेदवारी न मिळाल्याने पुगलिया गटाच्या महापौर, कॉंग्रेस व समर्थित ३० नगरसेवकांनी राजीनामे सादर केले. त्यामुळे पुगलिया आता आक्रमण भूमिका घेतील व पक्ष विरोधी भूमिका घेऊन बंडखोरी करतील, असा अंदाज होता. मात्र, राजीनामा नाटय़ानंतर पुगलिया यांनी बंडखोरी न करता शांतच राहणे पसंत केले आहे. स्वत:च्या कार्यकत्यांना सुध्दा त्यांनी शांत राहा, असा प्रेमाचा सल्ला दिला आहे.
तिकडे संजय देवतळे यांनी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, आमदार सुभाष धोटे, प्रभाकर मामुलकर यांच्या मदतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी देवतळेंना मतभेद विसरून पुगलिया यांची भेट घेऊन त्यांना विश्वासात घेण्याची सूचना केली होती, परंतु अतिआत्मविश्वासात असलेले देवतळे यांनी पुगलियांची अजूनही भेट घेतलेली नाही. त्यांच्या वतीने शिवाजीराव मोघे, आमदार वामनराव कासावार यांनी पुगलियांची भेट घेतली आहे.
मात्र, पुगलिया यांनी शांत राहून ‘वेट अॅन्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे, तर नुकतेच कॉंग्रेसवासी झालेले काही नेते देवतळे व पुगलिया यांची भेट होऊ नये यासाठी प्रयत्नरत आहेत.
अशा परिस्थितीत देवतळे यांनी स्वत: निर्णय घेणे गरजेचे असतांना त्यांनी काही सल्लागारांच्या मदतीने निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम तयार केला आहे. त्याचाही फटका स्वत: देवतळे यांना बसण्याची शक्यता आहे.
तिकडे काल मंगळवारी पुगलिया यांनी त्यांच्या गटाच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत पुन्हा एकदा त्यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांना संयमाने वागण्याचा सल्ला दिला. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत पुगलिया यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांशी व्यक्तीगत चर्चा केली.
मात्र, या बैठकीत नेमके काय झाले, याचा तपशील मिळू शकला नाही. सध्या तरी शांत राहणेच पसंत केल्याने राजकीय वर्तुळांचे लक्ष पुगलियांच्या राजकीय खेळीकडे लागले आहे, तर दुसरीकडे ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, पुगलिया हे अतिशय आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात एकूण राजकीय रागरंग पाहूनच ते स्वत:ची भूमिका ठरवतील, असेही राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
त्यांच्या भूमिकेवर या लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे चित्र अवलंबून आहे. त्यामुळेच या निवडणुकीत पुगलिया यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सध्या तरी पुगलिया शांत असले तरी राजकीय खेळीकडे कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह भाजप व आपच्या उमेदवाराचे सुध्दा लक्ष लागले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी व आरपीआय यांच्याकडून पालकमंत्री संजय देवतळे यांच्या नावाची घोषणा होताच चंद्रपूर शहर महापालिकेतील कॉंग्रेस व कॉंग्रेस समर्थित ज्या नगरसेवकांनी महापौरांकडे राजीनामा दिला त्यांचा हा राजीनामा फक्त दिखावा असून शहरातील कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल करण्यास दिला आहे. तरी कॉंग्रेस व कॉंग्रेस समर्पित नगरसेवकांनी हा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन मोकळे व्हावे अथवा प्रामाणिकपणे पक्षांनी घोषणा केलेल्या उमेदवाराला सहकार्य करून त्यांना बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस संदीप यासलवार यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 10:59 am

Web Title: naresh puglias wait watch strategy
Next Stories
1 रामटेकचा काँग्रेसला आतापर्यंत १३ वेळा ‘हात’
2 उन्हाळ्यात ग्राहकांकडून शहाळे व टरबुजाला मागणी
3 मदुराई-डेहराडून व चंदीगड-मदुराई एक्सप्रेस ३० मार्चपासून द्विसाप्ताहिक
Just Now!
X