लोकसभेच्या धक्कादायक निकालाने खडबडून जाग आलेल्या मनसेने शहरातील विकासकामांवर आपले लक्ष केंद्रित केले असून बुधवारी त्या अंतर्गत पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाचे वॉर्डनिहाय कामकाजाचे प्रगतिपुस्तक अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात आले. वेगवेगळ्या प्रभागांत चाललेल्या कामांचा आढावा घेताना याआधी सुरू झालेली कामांची सद्यस्थितीही राज यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. शहरातील रखडलेल्या वाहतूक बेटांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा नूर नेहमीपेक्षा एकदम वेगळा होता. आदल्या दिवशी स्थानिक पदाधिकाऱ्यांना ‘शालजोडे’ मारण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही आणि दुसऱ्या दिवशी महापौर, नगरसेवक, पालिका अधिकारी यांचा पुन्हा अभ्यास वर्ग घेत गतिमान होण्यास सूचित केले. मनसे अध्यक्षांची ही गतिमानता आगामी विधानसभा निवडणूक नाशिकमधून रिंगणात उतरण्यासाठी तर नाही ना, असा प्रश्न धुरिणांना पडला आहे.
मनसे अध्यक्ष राज यांच्या दौऱ्यातील दुसरा दिवस अतिशय व्यस्त होता. बुधवारी सकाळपासून त्यांनी वेगवेगळ्या घटकांशी बैठकांचे सत्र सुरू केले. दौऱ्यातील घडामोडींची माहिती मनसेच्या प्रवक्त्या शर्वरी लथ यांनी दिली. विश्रामगृहावर झालेल्या आढाव्यावेळी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आ. वसंत गीते, आ. उत्तम ढिकले व आ. नितीन भोसले उपस्थित होते. लोकसभेच्या निकालाने पक्षाच्या बालेकिल्ल्याला जबरदस्त हादरा बसल्याने मनसेने आपले सर्व लक्ष विकास या एकाच मुद्यावर केंद्रित केल्याचे अधोरेखीत झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज यांनी नाशिकचे संपर्कप्रमुख म्हणून अविनाश अभ्यंकर यांची नियुक्ती केली. त्यांच्यामार्फत मागील दहा दिवसांपासून मनसे नगरसेवकांच्या वॉर्डातील विकास कामांची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यात आली. कोणत्या वॉर्डात नेमकी काय कामे सुरू आहेत, कोणती कामे रखडली आहेत, त्याची कारणे, स्थानिक नागरिकांची भावना आदी माहिती अभ्यंकर यांनी संकलित केली होती. प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डनिहाय कामांचा अहवाल राज यांच्यासमोर सादर करण्यात आला. शहरात अनेक कामे सुरू असली तरी ती वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या स्वरूपानुसार काही कामे दृष्टिपथास येण्यास काहीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे विहित मुदतीत ती पूर्ण व्हावीत, यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे राज यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी शहरातील सुमारे ४० वाहतूक बेटांचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे सूतोवाच सत्ताधारी मनसेने केले होते. शहरातील काही उद्योजक व इतर संघटनांनी त्याचा भार उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्यातील काही वाहतूक बेटांचा आराखडाही तयार असून काहींच्या आराखडय़ाचे काम प्रगतिपथावर आहे. ज्या २४ बेटांचे आराखडे तयार आहेत, ती कामे लगेच सुरू करण्याचे निर्देश राज यांनी दिले.
महापालिकेशी संबंधित कामांचा आढावा घेतल्यानंतर राज यांनी नाशिक फर्स्ट या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ‘ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क’ प्रकल्पासह औद्योगिक वसाहतीतील प्रश्न, स्थानिक संस्था कर आदींविषयी चर्चा केली. वाहतूक उद्यानाची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी सादर केली. उद्योजक व महापालिका यांनी समन्वयाने काम केल्यास शहराचा विकास होण्यास फारसा वेळ लागणार नाही. औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबद्दलही राज यांनी माहिती घेतली. या घडामोडींमुळे राज ठाकरे विधानसभेची निवडणूक नाशिकमधून लढविणार असल्याच्या चर्चानी राजकीय वर्तुळात जोर पकडला.

महापालिकेला मिळणार पूर्णवेळ आयुक्त
शहरातील विकास कामांविषयी घेतलेल्या निर्णयाची तत्परतेने अंमलबजावणी व्हावी, यासाठी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा याविषयी मुख्यमंत्र्यांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चा केली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना संजय खंदारे यांची उचलबांगडी झाली होती. तेव्हापासून हे पद प्रभारी स्वरुपाचे आहे. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने कामकाजात अडचणी येतात. मुख्यमंत्र्यांनी नाशिक महापालिकेला लवकरच पूर्णवेळ आयुक्त देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती मनसेच्या प्रवक्त्या शर्वरी लथ यांनी दिली.