रविवारी वाळू माफियांनी एका तलाठय़ावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर, सोमवारी जिल्हा महसूल कर्मचारी आणि नाशिक जिल्हा तलाठी संघाने आपल्या मागण्यांनुसार कार्यवाही होईपर्यंत गौण खनिज कारवाईच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कारवाईसाठी संयुक्त पथक नेमून शासकीय वाहन उपलब्ध करणे, कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी गौण खनिज विभाग प्रमुख अथवा पथक प्रमुखावर जबाबदारी टाकावी, पोलीस संरक्षण व लेखी आदेशाशिवाय वाहनधारकांवर कारवाई न करणे या मुद्यांकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. तलाठय़ावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार असून वाळू माफियांवर कठोर कारवाई न झाल्यास १ एप्रिल पासून लेखणी बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक तालुक्यातील देवळाली व पाथर्डी येथील मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने अनधिकृत गौणखजिन वाहतुकी विरूध्द कारवाई सुरू केली. या मोहिमेत रविवारी मुंबई-आग्रा महामार्गावर मालमोटार क्षमतेहून अधिक वाळू भरून निघाली होती. पथकाने त्याबाबत विचारणा केली असता तलाठी अरूण पाटील यांना वाहनात बसून ट्रक कार्यालयात जमा करण्यास सांगितले. यावेळी पाटील यांना ट्रक चालकाने वाहन काही अंतरावर नेत चालत्या वाहनातून त्यांना फेकुन दिले.
या प्रकरणी पथकाने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. मागील काही दिवसात वाळू माफियांकडून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार वाढले आहेत. येवला, मनमाड, देवळा आदी ठिकाणी सुरू असणारे हे लोण आता शहरातही येऊन पोहोचले आहे. या घटनाक्रमाचा महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटनेने निषेध केला. सोमवारी संबंधित संघटनांची संयुक्त बैठक झाली. त्यात मागण्या मान्य झाल्याशिवाय गौण खनिजाबाबत कारवाई न करण्याचे निश्चित करण्यात आले.
याआधीही वाळू माफीयांकडून कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. अनधिकृत गौणखनिज वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना शस्त्रधारी पोलीस व शासकीय वाहन उपलब्ध करून द्यावे, संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागप्रमुख अथवा पथक प्रमुख यांनी स्वत गुन्हा नोंदविण्याबाबत सूचना द्याव्यात, कारवाई करणाऱ्या पथकाला मंडळ अधिकारी, तलाठी दुरध्वनीवरून सूचना देतात. त्यांना कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण दिले जात नाही. लेखी आदेश नसल्याने वाहनधारक तलाठी व मंडल अधिकाऱ्यांशी हुज्जत घालतात. अरेरावीची भाषा करतात. यामुळे पुढील काळात लेखी आदेश तसेच पोलीस संरक्षणाशिवाय कारवाई केली जाणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. महसूल अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देऊ नयेत, असेही प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या घटनाक्रमात काही अघटीत घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करावी असेही संबंधितांनी म्हटले आहे.
अनधिकृत वाहनधारकांवर कारवाई करताना नंदुरबार, धुळे, अहमदनगर येथून येणाऱ्या मालमोटारीत वाहतूक परवान्यापेक्षा जास्त गौणखनिज केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी वाळू उत्खनन होते, तिथे परवान्या इतकेच वाहने भरले जाईल याची दक्षता घेण्याची सूचना करावी, जेणेकरून पुढील प्रसंग टळू शकतात. या मागण्या मंजूर करून त्यांची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा सोमवार व मंगळवार असे सलग दोन दिवस कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करतील तसेच त्यानंतर बेमुदत लेखणी बंद आंदोलन छेडले जाईल, इशारा देण्यात आला आहे.