जिल्ह्यात गारपिटीच्या पाश्र्वभूमीवर राजकारण करण्यात येऊ नये, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी केले आहे. अपप्रचार करणाऱ्यांवर होळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.
निफाड तालुक्यात शनिवारी मोठय़ा प्रमाणावर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. गारपिटीमुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. अशा वेळी नुकसानग्रस्तांना धीर देण्याची गरज असताना काही घटकांकडून त्याचा उपयोग राजकारणासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे.
गारपिटीमुळे मुंबईकडे निघालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे ठाण्याहूनच परतले. रविवारी सकाळी त्यांनी खडकमाळेगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली. आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत निफाड तालुक्यातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना केल्याचेही होळकर यांनी नमूद केले आहे. याप्रसंगी सत्ताधारी पक्षातील काही जणांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन धिंगाणा घातल्याचा आरोपही त्यांनी केला. खडकमाळेगाव येथे भुजबळांची अडवणूक करून राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही बाब चुकीची असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
निफाड तालुक्यात गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालेले असताना सत्ताधारी पक्षातील एकही लोकप्रतिनिधी या भागात फिरकला नसल्याचा आरोपही होळकर यांनी केला.