आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महत्वपूर्ण ठरलेल्या इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती या दोन्ही पदांसाठी काढण्यात आलेल्या चिट्ठीने आमदार गटाच्या बाजूने कौल दिला असला तरी त्याआधी घडलेल्या नाटय़पूर्ण घडामोडींनी ही निवडणूक गाजली. अविश्वास ठराव नाटय़ानंतर ही निवडणूक घेण्यात येणार असल्याने तसेच आमदार गट आणि विरोधी गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्याने तिचे महत्व वाढले होते. आमदार गटास धोबीपछाड देण्यासाठी विरोधक एकवटले असल्याने त्यांच्या बाजूने कौल लागल्यास तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु सभागृहात नाटय़मय घडामोडी झाल्या. चिठ्ठी प्रक्रियेने विरोधकांना ‘चमत्कार’ दाखविल्याने आमदार गटाने या प्रक्रियेस ‘नमस्कार’ केला. १५ दिवसांपूर्वी ज्यांच्याविरूध्द अविश्वास ठराव संमत झाल्याने पायउतार व्हावे लागले होते. त्या ठकुबाई सावंत यांच्यावर चिठ्ठीने पुन्हा सभापतीपदी बसविले. तर उपसभापती म्हणून सविता जगताप यांची वर्णी लागली. दोन्ही पदे आ. गावित, ज्येष्ठ नते जनार्दन माळी यांच्या गटाकडे गेली.
सभापती, उपसभापती निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष लागून होते. त्यासाठी सोमवारी निवड प्रक्रिया घेण्यात आली. तहसीलदार महेंद्र पवार यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रियेस सुरूवात झाली. सभापतीपदासाठी ठकुबाई सावंत व जिजाबाई कौले यांनी तर उपसभापती पदासाठी सविता जगताप, वैशाली सहाने, रमेश जाधव यांनी अर्ज दाखल केले. माघारीच्या वेळेत जाधव यांनी माघार घेतली. त्यामुळे सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. परंतु यात दोघांनाही समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीव्दारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठकुबाई सावंत यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सभापती म्हणून तर, उपसभापती पदासाठी सविता जगताप यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी कौले यांच्या गटाकडे गोपाळ लहांगे, पांडुरंग वारुंगसे, मुक्ता गोवर्धने, वैशाली सहाणे हे होते. तर, ठकुबाई सावंत गटाकडे रमेश जाधव, हरिदास लोहकरे, लहानू हिंदोळे, सविता जगताप हे होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार निर्मला गावित, ज्येष्ठ नेते जनार्दन माळी, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अलका जाधव आदी उपस्थित होते.