चैत्र महिना सुरू झाल्यानंतर नवी मुंबईतील २९ गावांत पारंपरिक जत्रा सुरू होणार असून त्याबरोबर यंदा निवडणूक जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने अखेर नवी मुंबई आणि औरंगाबाद पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून पुढील महिन्यात २२ मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. औरंगाबाद पालिकेच्या आस्ते कदम कारभारामुळे ही आचारसंहिता लागण्यास विलंब झाला होता; परंतु सोमवारपासून ही आचारसंहिता लागली आहे. सोमवारी आचारसंहिता लागण्याची शक्यता महामुंबई वृत्तान्तने शनिवारी व्यक्त केली होती.
नवी मुंबई पालिका सभागृहाची मुदत ८ मे रोजी संपत आहे, तर औरंगाबाद पालिका सभागृहाची मुदत २७ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने २३ एप्रिलपर्यंत या दोन्ही निवडणुका पार पडतील याची काळजी घेतली आहे. ३१ मार्च ते ७ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दिले जाणार असून ८ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार आहे. १० एप्रिल रोजी अर्जाची छाननी आणि ११ एप्रिल रोजी चिन्हवाटप केले जाणार आहे. २२ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी वाशीत मतमोजणी होणार आहे. पक्षीय उमेदवारांना त्यामुळे १२ दिवस प्रचारासाठी मिळणार असून अपक्ष किंवा ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांना ३१ मार्चपासून या जत्रेत सहभागी होता येणार आहे. त्यांना तब्बल २१ दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत.
एकदाची आचारसंहिता लागल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे अधिकार आयोगाने कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांना हा खर्च दररोज सादर करावा लागणार आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात खरा सामना होणार असून दोन्ही पक्षांतील प्रचारयुद्ध रंगणार आहे. ७ एप्रिल रोजी अनेक पक्षांत फूट पडणार असून राष्ट्रवादीनंतर शिवसेनेला ही फूट भोवणार आहे.