नवी मुंबई परिवहन विभागाच्या प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली हेल्पलाइन सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या हेल्पलाइनवर तक्रार करण्यासाठी प्रवाशाने संपर्क साधल्यास त्याला मदत मिळण्याऐवजी मनस्तापच सहन करावा लागत आहे. या ठिकाणी असलेले कर्मचारी प्रवाशांना उर्मटपणे बोलत असून अनेकदा रिसिव्हर बाजूला ठेवून गप्पा मारण्यात मग्न होत असल्याचा अनुभव प्रवाशांना आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १८००२६७४७४७ हा टोलफ्री क्रमांक सुरू केला आहे. या ठिकाणी प्रवाशांनी कोणतीही तक्रार करण्यासाठी संपर्क साधला असता येथील वाहतूक आधिकारी प्रवाशांना माहिती देण्यास टाळाटाळ करतात. तर फोन केल्यांनतर अंतर्गत गप्पांमध्ये व्यस्त होऊन १५ ते २० मिनिटे प्रवाशांना तसेच ताटकळत ठेवतात. अनेकदा उर्मटपणाची वागणूक मिळत असल्याची महिलांची तक्रार आहे. ही सेवा प्रशासनाने प्रवाशांसाठी सुरू केली की आधिकाऱ्यांसाठी, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेला अनेकदा प्रवाशांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधला असता, त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव प्रवाशांना आहे. एकीकडे तोटय़ातील परिवहन सेवा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने अनेक नवनवीन योजना सुरू करून प्रवाशांना जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र काही आधिकारीच प्रशासनाच्या या नवनवीन योजनांना खीळ लावत असल्याचे चित्र आहे. परिवहनचे सभापती गणेश म्हात्रे यांच्याकडे या परिस्थितीबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून या संदर्भात माहिती घेऊन बोलतो असे उत्तर देण्यात आले. अधिक माहितीसाठी परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड याच्यांशी सातत्याने संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली.