तालुक्यात वीजपुरवठा कधीही खंडित होत असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान, अवाजवी देयके यांसह इतर कारणांमुळे नागरिक हैराण झाले असून सात दिवसांत कामकाजात सुधारणा न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे यांनी दिला आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आले.
महावितरणच्या गलथान कारभाराविषयी वर्षभरात अनेक वेळा अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही कारभारात कोणतीच सुधारणा झाली नसल्याचे धोंगडे यांचे म्हणणे आहे. तालुक्यात होत असलेले अघोषित भारनियमन, अवाजवी वीज देयके, देयक भरूनही खंडित होणारा वीजपुरवठा, खांब तसेच तारांसह इतर साहित्य जुनाट झाल्यामुळे होणारे जीवघेणे अपघात असे मुद्दे या वेळी मांडण्यात आले.
वाडीवऱ्हे येथील बोडके हे अधिकारी ग्रामस्थांशी अरेरावी करतात अशी तक्रारही या वेळी करण्यात आली. महावितरणच्या गैरकारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून अधिकाऱ्यांनी सात दिवसांत शेतकऱ्यांची या विषयावर बैठक घेण्याची मागणीही इगतपुरी येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी धोंगडे यांच्यासह विष्णू चव्हाण, अशोक गायकर, हिरामण काटे, जयराम गव्हाणे आदी उपस्थित होते.