समाजातील वाईट गोष्टींच्या प्रथांचा संबंध धर्माशी जोडू नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत, यासंदर्भात वाईट प्रथांच्या नावाखाली धर्मावर होणारे आरोप आता थांबविण्याची गरज असल्याचे मत हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र कोहली यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंती वर्षांनिमित्त विवेकानंद सार्ध शताब्दी समारोह समितीच्यावतीने सोलापुरात आयोजिलेल्या स्वामी विवेकानंद साहित्य संमेलनाचा समारोप करताना संमेलनाध्यक्ष डॉ. कोहली यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यावेळी त्यांनी धर्माच्या संरक्षणासाठी अधर्माला मारण्याची गरजच असते, त्याच पध्दतीने धर्मावर ऊठ सूठ आरोप करणाऱ्यांनाही प्रतिउत्तर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात दोन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाचा समारोप विवेकानंद केंद्राचे प्रांतप्रमुख बसवराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ए. जी. पाटील, सार्ध शती समारोह समितीचे जिल्हाध्यक्ष धर्मराज काडादी आदी उपस्थित होते.
बसवराज देशमुख म्हणाले, स्वामी विवेकानंद भ्रमंतीच्या काळात आपल्या भाषण तथा लेखन साहित्याचे जतन करीत नसत. त्यांचे शिष्य जे. जे. गुडविन यांनी ते जपून ठेवले. स्वामी विवेकानंदांच्या तेरा खंडांतून साहित्याची निर्मिती व पहिले चरित्र देण्याचे काम मराठय़ांनी केले. त्यातून देशाला विवेक विचार मिळाले, असे उद्गार त्यांनी काढले.
या संमेलनाच्या समारोपप्रसंगी पुढील विवेकानंद साहित्य संमेलन इंदूर येथे आयोजित करण्याचे निमंत्रण ज्येष्ठ पत्रकार अभिलाष खांडेकर यांनी दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करीत पुढील वर्षांचे संमेलन इंदूरला घेण्याचे सुधील जोगळेकर यांनी जाहीर केले. प्रा. शिवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सुनीर कुलकर्णी यांनी आभार मानले.