इंग्रजी ते मराठी, इंग्रजीचे हिंदी अगदीच मराठी ते इंग्रजी अर्थ सांगणाऱ्या शब्दकोशांच्या अ‍ॅप्सची अ‍ॅप बाजारात मोठी गर्दी आहे. याच गर्दीत इंग्रजी शब्दांचा संस्कृत अर्थ सांगणारे ‘शब्दलहरी’ नावाचे अ‍ॅप लोकांच्या पसंतीस उतरू लागले आहे.
संस्कृत भाषा सर्वांपर्यंत पोहचावी या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून इंग्रजी आणि संस्कृत शब्दांचा अर्थ सांगणारे मोबाइल अ‍ॅप विकसित करावे अशी कल्पनासमोर आली आणि या अ‍ॅपचे काम सुरू झाले. खांडबहाले डॉट कॉम या ऑनालाइन शब्दकोश संकेतस्थळाचे सुनील खांडबहाले यांची मदत घ्यायचे ठरले आणि तत्कालीन विभाग प्रमुख उमा वैद्य यांच्या नेतृत्त्वाखाली काम सुरू झाले. सुरुवातीला विद्यापीठाने दिलेल्या निधीतून मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील संस्कृत विभागात एक संगणकाची लॅब उभारण्यात आली. यामध्ये आठ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नियुक्तीही करण्यात आली.
या विद्यार्थ्यांनी आणि विभागातील प्राध्यापकांनी तब्बल १५ हजार शब्दांचा संग्रह तयार केला आणि अ‍ॅप सुरू केल्याचे संस्कृत विभागाच्या प्रमुख गौरी माहुलीकर यांनी सांगितले. हे अ‍ॅप संध्या खांडबहाले यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून ते मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते सध्या शक्य होत नसल्याचेही माहुलीकर यांनी सांगितले. या अ‍ॅपवर आपण इंग्रजी शब्द टाकल्यावर केवळ त्याचा अर्थच येतो असे नाही तर तो संस्कृत शब्द असलेले वाक्य, सुभाषितंही दिली जातात.
भविष्यात हे अ‍ॅप ५० हजार शब्दांनी समृद्ध करण्याचा मानस माहुलीकर यांनी व्यक्त केला आहे. अनेकदा भाषणांमध्ये सुभाषित किंवा संस्कृत वाक्यांचा वापर होताना दिसतो. यामुळेच भाषणांच्या विविध विषयांच्या भाषणांसाठी सुभाषितं, वाक्य यांचाही समावेश करण्याचा मानस आहे.
मात्र सध्या निधीची कमतरता आहे. त्याची जुळवाजुळव सुरू असून एकदा निधी उपलब्ध झाला की काम सुरू होईल असेही माहुलीकर यांनी स्पष्ट केले.