इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) याहीवर्षी नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात केली असून अर्ज भरणे आणि प्रवेश परीक्षांच्या तारखा घोषित केल्या आहेत. जुलैपासून ‘शहर नियोजन आणि विकास’ तसेच ‘बालकांचे आरोग्य’ यासंबंधीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इग्नूत जानेवारी आणि जुलै असे दोनवेळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.
पदव्युत्तर पदविका प्राप्त करून देणारा ‘शहर नियोजन आणि विकास’ अभ्यासक्रम जुलै-२०१४ पासून सुरू होणार आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाची शहरी व्यवस्था भारतात आहे. २०२५पर्यंत भारताची ५० टक्के लोकसंख्या शहरात वसेल, असे भाकित केले जाते. शहरांसाठी योग्य नियोजन न केल्यास भविष्यात वाहतूक, पिण्याचे पाणी, स्वच्छता, झोपडपट्टय़ा पुनर्वसन आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणूनच महापालिका नगरसेवक, वास्तुशास्त्रकार, स्थापत्य अभियंता आणि रियल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर असल्याचे प्रतिपादन इग्नूचे प्रादेशिक संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी केले.
 एक वर्षांच्या या अभ्यासक्रमाचे शुल्क २,८०० रुपये असून कोणत्याही शाखेचा पदवीधर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. याशिवाय वाशीममध्ये गंगा नर्सिग शाळेत माता व बालक आरोग्य नर्सिग प्रमाणपत्र कार्यक्रम, नवजात बालक आणि नर्सिग प्रमाणपत्र अभ्यासक्रम इग्नूने सुरू केला आहे.
इग्नूत २२८ अभ्यासक्रमांना येत्या ८ जुलैपर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत तर विलंब शुल्कासह ३० जुलैपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश अर्जाचे मूल्य २०० रुपये आहे. एमबीएची प्रवेश परीक्षा १७ ऑगस्टला आयोजित करण्यात आली असून अर्जाची किंमत एक हजार रुपये आहे.
इग्नूच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बी.एड. अभ्यासक्रमाला या भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्यावर्षी ९ हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला होता. अध्यापनात कार्यरत लोकांसाठी बी.एड. अभ्यासक्रम विद्यापीठाने उपलब्ध करून दिला आहे. अर्ज मूल्य १ हजार रुपये असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे.
या शिवाय इग्नूने तात्पुरत्या प्रवेशाची सोयही उपलब्ध करून दिली आहे. देशभरातील अनेक अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाईन लागतात. मात्र, गुणपत्रिका आणि तात्पुरते प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना उशिरा उपलब्ध होते. जे विद्यार्थी पुढील वर्षांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांंसाठी ही सोय करण्यात आल्याचे डॉ. शिवस्वरूप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अभ्यासक्रमांना प्रवेश- ८ जुलै
विलंब शुल्कासह प्रवेश-३० जुलैपर्यंत
बी.एड., एम.एड. अर्ज भरणे- १५ जुलैपर्यंत
एम.एड.साठी प्रवेश परीक्षा १७ ऑगस्ट
एमबीएची प्रवेश परीक्षा-१७ ऑगस्ट