ऐन सुटीच्या दिवशी रेल्वेने प्रवास करायचा झाला आणि पास नसेल, तर तिकीट खिडक्यांपुढील रांग पाहूनच अनेकांचा उत्साह मावळतो. मात्र रांगेत उभे राहिल्यानंतर किती वेळात आपल्याला तिकीट मिळेल, हे आधीच कळले तर? हे आता सहज शक्य होत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही प्रशासनांनी या तिकीट रांगांचा अभ्यास करून शोधलेल्या तंत्रामुळे आता प्रवाशांना रांगेत उभे राहिल्यावर किती मिनिटांत तिकीट हाती पडेल, हे कळणे शक्य होत आहे. प्रवाशांना हे कळवण्यासाठी दोन्ही रेल्वे प्रशासनांनी तिकीट खिडक्यांपासून ठरावीक अंतरावर दोन ठिकाणी दोन पट्टय़ा चिकटवल्या आहेत. या पट्टय़ांवर ‘येथून पुढे दहा मिनिटे’ आणि ‘येथून पुढे पाच मिनिटे’ असे लिहिले आहे.
स्मार्टकार्ड, जेटीबीएस असे अनेक पर्याय उपलब्ध असूनही तिकीट खिडक्यांसमोर रांग लावणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र ही रांग किती वेळात संपेल किंवा आपल्याला कधी तिकीट मिळेल, याबाबत प्रवाशांच्या मनात नेहमीच शंका असते. अनेकदा तर रांग बघून ‘बाप रे, किमान अर्धा तास तरी मोडेल’, असे पाहून प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. मात्र प्रत्यक्षात ही प्रचंड वाटणारी रांग केवळ दहा मिनिटांत पुढे सरकलेली असते.
प्रवाशांना याबाबत माहिती असावी, रांगेत उभे राहिल्यानंतर किती वेळात तिकीट मिळेल, हे त्यांना कळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने या तिकीट रांगांचा अभ्यास केला. तिकीट खिडकीवर एक तिकीट देण्यासाठी सरासरी किती वेळ लागतो, एका मिनिटात किती प्रवाशांना तिकीट दिले जाऊ शकते, सुटे पैसे वगैरे देण्यात किती वेळ जातो, या गोष्टींची मोजणी करून रेल्वेने काही निष्कर्ष काढले.
या निष्कर्षांनुसार एका मिनिटात साधारण दोन-तीन प्रवाशांना तिकीट मिळू शकते. या हिशोबाने पाच मिनिटांत बारा-तेरा लोकांना तिकीट दिले जाते. हाच हिशोब दहा मिनिटांसाठी २२-२४ माणसांचा असतो. त्यानुसार रेल्वेने बारा माणसे उभे राहण्यासाठी लागणाऱ्या जागेच्या पुढे ‘येथून पुढे पाच मिनिटे’ आणि २४ माणसे उभे राहण्यासाठी लागणाऱ्या जागेच्या पुढे ‘येथून पुढे दहा मिनिटे’ अशा दोन पट्टय़ा प्रत्येक तिकीट खिडकीसमोर लावल्या आहेत. विशेष म्हणजे वेळ लावून बघितल्यास बहुतांश खिडक्यांवर खरोखरच पट्टय़ापासून दिलेल्या वेळेत माणूस तिकीट घेऊन रांगेबाहेर पडलेला असतो.