रातकीडय़ांच्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दक्षिणेतील वादळी वातावरणामुळे नागपुरातील वाताावरणातही बदल झाल्याने ते या रातकीडय़ांना पोषक ठरले आहे. आणखी काही दिवस रातकीडय़ांचा उच्छाद नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
गेल्या आठवडय़ापासून रातकीडे नागरिकांना सतावू लागले आहेत. सायंकाळनंतर रातकीडय़ांची गर्दी होऊ लागते. दिव्यांखाली रातकीडे मोठय़ा प्रमाणात गोळा होतात. रस्ता, घर असो की दुकान सर्वत्रच रातकीडय़ांच्या संचार सुरू असतो. रस्त्याने जाताना हेच कीडे डोळ्यांमध्ये हमखास शिरतात. मागील शुक्रवारी धान, कपाशी आणि इतर पिकांसाठी नुकसानकारक ठरणाऱ्या रातकीडय़ांनी शहरातील बाजारापेठ बंद पाडली होती. एरवी पावसाळ्यात दिसणारे कीडे आता कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ऑगस्ट महिना संपल्यानंतर पाऊस कमी होतो आणि हेच वातावरण रातकीडय़ांना प्रजनन वाढविण्यासाठी पोषक आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे रातकीडय़ांचे प्रजनन अतिशय वेगाने झाले. लांबलेला पाऊस, पश्चिम बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळाचा येथील वातावरणावर परिणाम झाला. हे वातावरण रातकीडय़ांना पोषक ठरले. रातकीडय़ांची मादी पानाच्या आत ५० ते १५० अंडी घालते. मोठय़ा प्रमाणात जन्माला येणाऱ्या रातकीडय़ाचे आयुष्य फक्त अठरा दिवसांचे असते. विषेषत: सोयाबीन, सूर्यफूल, वांगी, बटाटा, मुग, शेंगदाणे आदी झाडांच्या पानांवर हे कीडे आढळतात. मात्र नैसर्गिक अन्नसाखळी कायम ठेवण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा भाग असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या रातकीडय़ांना तुडतुडे, हॉपर, जांगीड या नावाने देखील ओळखले जातात. रातकीडय़ांमुळे धानाला जास्त धोका पोहचतो. त्याचप्रमाणे कपाशीलाही धोका असतो. रातकीडे माणसांसाठी घातक नसले तरी ते चावतात. डासांप्रमाणे माणसाचे रक्त शोषून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु या रातकीडय़ांचा  प्रादुर्भाव वाढल्यास पिकांचे नुकसान होते. या रातकीडय़ांमधील धानासाठी हिरवे आणि पांढरी पाठ असलेले रातकीडे, तसेच तपकिरी रंगाचे रातकीडे अतिशय नुकसानकारक असतात. रातकीडे धान, कपाशी, इतर पिके यांच्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे धान पिवळे पडते, कपाशी करपून जाते. या रातकीडय़ांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकांचे नुकसान होऊन त्यांना धोका पोहचतो. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करणे शेतकऱ्यांना गरजेचे आहे. पण ही फवारणी करताना कोणत्या प्रकारचे कीटकनाशक असावे याची मर्यादा पाळावी लागते. नाही तर त्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होऊन रातकीडय़ांची प्रतिकार शक्ती वाढते. मग मात्र ते कोणत्याही औषधाला जुमानत नाहीत.
रातकीडे वाढणे हे शेतीसाठी योग्य नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन उपाययोजना करावी आणि आपली पिके वाचवावी, असेही आवाहन या कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.