पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात महिलांनीसुद्धा काम करायला सुरुवात केली आहे. कॉल सेंटर्स, रुग्णालये, आयटी क्षेत्रात रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर दिवसपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये हृदयरोग व रक्तवाहिन्यांच्या आजारांची शक्यता बळावल्याचे नव्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. यापूर्वी स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये दिसून आले होते.
तीन वर्षांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेतील संशोधकांनी ३ हजार महिलांची पाहणी केली. त्यावेळी सलग साडेचार वष्रे किंवा त्यापेक्षा अधिक वष्रे रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा अधिक धोका असल्याचे स्पष्ट केले. दिवसाच्या तुलनेत रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये हा धोका ३० टक्क्यांनी अधिक आहे. अमेरिकेतील संशोधकांनी त्यानंतर केलेल्या सर्वेक्षणात रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे सांगितले. त्यांनीही तीन हजार महिलांचे सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला. दिवसा काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका ४९ टक्क्यांनी अधिक असल्याचे स्पष्ट केले. निद्रेसाठी कारणीभूत असणारे मिलेटोनिन नामक हार्मोन या रोगासाठी कारणीभूत असल्याचे संशोधनातून दिसून आले. मात्र, या अनुषंगाने आणखी संशोधन होणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, झालेल्या संशोधनात रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले होते. या संशोधनाला कर्करोग संशोधनाकरिता असलेल्या आंतररराष्ट्रीय एजन्सीने दुजोरा दिला आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या शरिरात अनेक बदल होत असल्याचे दिसून आले. ‘ऑक्युपेशनल अँड एन्व्हायरोन्मेंटल मेडिसीन’ या वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आता नव्या एका संशोधनात पाच किंवा त्याहून अधिक वेळा बदलणाऱ्या रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये हृदय किंवा रक्तवाहिन्यांच्या रोगापासून मृत्यूचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००७ मध्ये जागतिक आरोग्य परिषदेने रात्रपाळीची वर्गवारी केली. १९७६ मध्ये त्यांनी सुरुवात केली आणि आता दर दोन वर्षांनी प्रश्नावलीसह ते पाठपुरावा करत आहेत. आता नुकत्याच झालेल्या संशोधनात संशोधकांनी परिचारिकांच्या आरोग्याचा अभ्यास केला. या संशोधनात ३० ते ३५ वयोगटातील १ लाख २१ हजार ७०० परिचारिकांचा अभ्यास करण्यात आला. या सर्व अभ्यासानंतर पाच वर्षांपेक्षा अधिक काम करणाऱ्या सुमारे ११ टक्के महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. १५ वर्षांंहून अधिक काळ रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगापासून मृत्यू होण्याचे प्रमाण १९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. फफ्फुसाच्या कर्करोगाचा २५ टक्के जास्त धोका असल्याचेही स्पष्ट झाले आहे.