शहरात ठिकठिकाणी पडलेले डेब्रिज, उघडय़ावर शौचास बसणारे रहिवासी, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे व्यापारी, खारफुटीची तोड करणारे ग्रामस्थ, पाळीव प्राण्यांना रस्त्यावर शौचास नेणारे नागरिक, रस्त्यात कुठेही थुंकणारे, लघुशंका करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पालिका मुंबईच्या धर्तीवर अस्वच्छता प्रतिबंधक पथक नेमणार आहे. पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी ही माहिती दिली. त्यासाठी या पथकातील जवानांना मोटारसायकली देण्याची तयारीही पालिकेने दर्शवली आहे. नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अलीकडे अनेक गोष्टी अनियोजनबद्ध होत आहेत. त्यामुळे शहरात आजही मुंबईतून येणारे डेब्रिज मोठय़ा प्रमाणावर येत आहे. गतवर्षीपेक्षा पालिकेने असे डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर दुप्पट कारवाई केली आहे, पण शहर अद्यापि डेब्रिजमुक्त झालेले नाही. तुर्भे स्टोअर, तळवळी नाका यांसारख्या शहरी भागातही उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांची संख्या जास्त असून पालिका अद्यापि शौचमुक्त शहर बनवू शकलेली नाही. २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर शासनाने बंदी घातली आहे, पण नवी मुंबईत आजही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास केला जात आहे. प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या व्यापाऱ्यावर जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. तो दंड भरण्याची ऐपत त्या व्यापारी, फेरीवाल्याची नसल्याने पालिके अधिकारी या फेरीवाल्यांना सोडून देत असल्याचे समजते. मुंबई ग्राहक पंचायतच्या ठाणे विभागाने या संदर्भात पालिका प्रशासनाला तीन वर्षांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे, पण पालिका प्रशासन नवी मुंबई प्लास्टिकमुक्त करण्यास हतबल ठरली आहे. खारफुटीची आजही काही प्रमाणात तोड होत आहे. ती रोखण्यासाठी शासनाने वनविभागाला अधिकार दिले आहेत, पण कमी मनुष्यबळाअभावी ही कारवाई होत नाही. पाळीव प्राण्यांची संख्या शहरात वाढली आहे, पण त्यांना उघडय़ावर शौचास नेणारे नागरिक शहराच्या अस्वच्छतेत भर घालत आहेत. रस्त्यात कुठेही पानाच्या व थुंकीच्या पिचकाऱ्या मारून शहर विद्रूप करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्याचप्रमाणे कुठेही कोपऱ्यात मूत्रविसर्जन करणारे महाभागही जास्त आहेत. या सर्व शहर अस्वच्छतेस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर नजर ठेवण्यासाठी पालिका आता प्रतिबंधक पथक नेमणार असून त्यात तरुणांचा भरणा मोठय़ा प्रमाणात केला जाणार आहे. पालिकेकडे डेब्रिज प्रतिबंधक पथक आहे पण ते केवळ डेब्रिजच्या बाबतीत लक्ष देत असल्याने या पथकाबरोबरच फिरणारे न्यू सेन्स पथक लवकरच अस्तित्वात आणले जाणार असून शहर प्लास्टिक, डेब्रिज, कचरामुक्त करण्याचा निर्धार आयुक्त जऱ्हाड यांनी व्यक्त केला.