कांदा लिलाव बंद ठेवण्याच्या व्यापाऱ्यांच्या निर्णयास बाजार समितीच्या प्रशासनाने छुपे पाठबळ दिल्याने अखेर बुधवारी कांद्याचे लिलाव झालेच नाहीत. शेतकऱ्यांनी आणलेला कांदा व्यापाऱ्यांच्या दारात तसाच पडून असून येत्या रविवारपर्यंत कांद्याचे भाव आणखी कोसळल्यास शेतकऱ्यांना कोटय़वधीचा  तोटा होण्याची भिती आहे.
गेल्या रविवारी बाजार समितीच्या आवारात तब्बल दोन लाख कांदा गोण्यांची आवक झाली. त्यानंतर इतर बाजारपेठांच्या तुलनेत भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. त्यानंतर भाव वधारले. मात्र देशपातळीवर आणखी भाव कोसळयाने काही व्यापाऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले. ही आफत पुन्हा बुधवारीही ओढवू नये यासाठी व्यापाऱ्यांनी बुधवारी कांद्याचे लिलाव होणार नसल्याचे एकतर्फी जाहीर केले. बाजार समितीचे संचालक मंडळ तसेच प्रशासनास विश्वासात न घेण्यात आल्याने संचालक मंडळ व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून लिलाव करण्यासंदर्भात तंबी देईल अशी अपेक्षा होती. मात्र व्यापाऱ्यांच्या दबावाखाली झुकून संचालक मंडळाने कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे बुधवारी कांद्याचे लिलाव होऊच शकले नाहीत.
व्यापाऱ्यांनी लिलाव होणार नसल्याने कांदा विक्रीसाठी न आणण्याचे अवाहन केल्याने अनेक शेतक-यांनी कांदा लिलावासाठी आणला नाही. आता हाच कांदा रविवारी होणाऱ्या लिलावासाठी आणला जाईल. ज्या शेतकऱ्यांपर्यंत व्यापाऱ्यांची भूमिका पोहचली नाही त्यांनी बुधवारच्या लिलावासाठी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणला. आता हा कांदाही रविवारपर्यंत तसाच पडून राहणार आहे.