शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह दारणा धरणातील गाळ सर्वेक्षणाचे नव्याने हाती घेण्यात आलेले काम ‘पॉवर बोट’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रखडले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) दूरसंवेदन विभागाची पॉवर बोट परदेशी बनावटीची असल्याने तिचे सुट्टे भाग मिळण्यास विलंब होत आहे. या कारणास्तव साधारणत: अकरा वर्षांच्या कालावधीनंतर होणारे गाळ सर्वेक्षण अध्र्यावरच रेंगाळले आहे. परिणामी, गाळात रुतलेल्या गंगापूर व दारणा धरणाची आजची साठवण क्षमता समजण्यास काहीसा कालापव्यय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंगापूर व दारणा या धरणांतील गाळ सर्वेक्षण याआधी २००२ मध्ये करण्यात आले होते. तथापि, त्या पुढील काळात पुन्हा किती गाळ जमा झाला आणि त्याचा साठवण क्षमतेवर झालेला परिणाम, याची पडताळणी या सर्वेक्षणातून होणार आहे. गतवर्षी त्यास सुरुवात झाली. परंतु पॉवर बोटमधील बिघाडामुळे ते अद्याप पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही. ‘इंटिग्रेटेड बॅथमेट्रिक सर्वे’ (डीजीपीएस) या पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यापूर्वीचे सर्वेक्षण उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रांच्या (रिमोट सेन्सिंग) पद्धतीने झाले होते. त्यापेक्षा ‘डीजीपीएस’ ही पूर्णत: वेगळी पद्धत आहे. या सर्वेक्षणात पाण्याची खोली निश्चित करण्यासाठी पॉवर बोटीचा आधार घेतला जातो. ही बोट जलाशयावर विशिष्ट पूर्वनियोजित रेंज लाइनवर चालवून निरनिराळ्या ठिकाणाची खोली व स्थान निश्चितीद्वारे गाळाचे प्रमाण व साठवण क्षमतेचा अंदाज घेतला जातो. म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत पॉवर बोटीचे काम अतिशय महत्त्वपूर्ण असते. काही महिन्यांपूर्वी मेरीने गंगापूर धरणावर पॉवर बोट आणून हे काम सुरू केले होते. परंतु, ही बोट नादुरुस्त झाल्यामुळे ते मध्येच बंद पडले. त्यास नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी दुजोरा दिला.
गाळ सर्वेक्षणासाठी वापरली जाणारी पॉवर बोट १५ वर्षांपूर्वी मेरीने परदेशातून खरेदी केली होती. या बोटीच्या आधारे आजवर राज्यातील व परराज्यातील अनेक धरणांचे गाळ सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सध्या तिच्या दुरुस्तीसाठी काही सुट्टे भाग बदलविणे अपरिहार्य आहे. हे सुट्टे भाग परदेशातून आल्यावर बोट पुन्हा कार्यान्वित होईल, असे सांगितले जाते. तोपर्यंत गंगापूर व दारणा धरणांतील गाळ सर्वेक्षणाचे काम रखडणार आहे. पाटबंधारे विभाग या कामासाठी तब्बल नऊ लाख रुपये खर्च करत आहे.
धरणातील गाळाचा अभ्यास करताना निधीअभावी अडथळे येऊ नयेत म्हणून देखभाल व दुरुस्तीच्या कामांच्या आराखडय़ात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शासकीय लालफितीतून मार्गस्थ झालेली ही प्रक्रिया आता तांत्रिक दोषात अडकली आहे.
गाळाचे वाढते प्रमाण
गंगापूर व दारणा धरणांतील गाळाचे सर्वेक्षण अकरा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तेव्हा गंगापूर धरणाची ७,२०० दशलक्ष घनफूट असणारी मूळ साठवण क्षमता ५,६०० दशलक्ष घनफूटपर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणजे, त्यावेळी धरणात १६०० दशलक्ष घनफूट गाळ असल्याचे निदर्शनास आले. दारणा धरणाची मूळ साठवण क्षमता ७,७६३ दशलक्ष घनफूट होती. सर्वेक्षणाअंती गाळामुळे ही क्षमता ७,१४९ दशलक्ष घनफूटवर आल्याचे मेरीने म्हटले. यावरून या धरणात ६१४ दशलक्ष घनफूट गाळ साचल्याचे स्पष्ट झाले.
गाळ सर्वेक्षणाचे प्रयोजन का ?
पावसाळ्यात पाण्याबरोबर गाळ मोठय़ा प्रमाणात वाहून येत असल्याने तो साचून धरणांच्या साठवण क्षमतेत घट होते. पाण्याचे वार्षिक नियोजन करताना गाळाच्या प्रमाणाकडे लक्ष न दिल्यास उन्हाळ्यात संबंधित धरणाच्या लाभक्षेत्रास टंचाईला सामोरे जावे लागते. गतवर्षी मान्सून लांबल्याने धरणात किती जलसाठा शिल्लक आहे, यावरून नाशिक महापालिका आणि पाटबंधारे विभागात चांगलीच जुंपली होती. पाटबंधारे विभाग जलसाठय़ाविषयी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आक्षेप पालिकेतील धुरिणांनी नोंदविला होता. धरणाची सध्याची साठवण क्षमता लक्षात आली तर नियोजन करताना त्याचा उपयोग होऊ शकतो.  साठवण क्षमता कमी होऊनही मूळ क्षमता गृहीत धरून पाण्याचे नियोजन केल्यास मुखभंग होतो, याची जाणीव पाटबंधारे विभागालाही आहे. २००२ मधील सर्वेक्षणानंतर अकरा वर्षांत धरणातून बरेच पाणी वाहून गेले. या कालावधीत दोन्ही धरणांमध्ये साचलेल्या गाळाचे प्रमाण किती आहे, याचा अभ्यास पुन्हा मेरीकडून हाती घेण्यात आला. गाळाचे सध्याचे प्रमाण समजले की, त्यावरून धरणाची सध्याची साठवण क्षमता लक्षात येईल. ही साठवण क्षमता डोळ्यासमोर ठेवून पाण्याचे वार्षिक नियोजन करता येईल. जेणेकरून कोलमडणाऱ्या नियोजनात सूसुत्रता आणण्यात हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.