आशिया खंडातील सर्वात मोठे उपचार केंद्र म्हणून ख्याती असलेल्या मेडिकल रुग्णालयातील स्वच्छता आणि विद्युत दिव्यांच्या व्यवस्थेची पार दैन्यावस्था झाली आहे. मेडिकलमध्ये विदर्भ तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेशातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालय परिसरात घाणीची बजबजपुरी झाली असून रुग्णालयाच्या अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे अंधाराचा फायदा घेऊन एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मेडिकलची साफसफाई आणि विद्युत व्यवस्था, इतर व्यवस्थेची जबाबदारी सार्वजनिक विभागाकडे सोपविण्यात आली आहे. डागडुजी, इमारत उभारणी बांधकाम, प्रकाश व्यवस्था, इतर विद्युत विभागाशी संबंधित असलेली कामे या विभागाकडे सोपविण्यात आली आहे. परंतु, या विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना या अंधारात वावरावे लागते. मेडिकलच्या नूतनीकरणासाठी शासनाने दिलेल्या निधीतून अनेक विभागाचे काम सुरू आहे. मात्र, काही वॉर्डासमोरील व्हरांडय़ात अंधारच आहे. अनेका वॉर्डामध्ये पंख्याची व्यवस्था नाही तसेच काही वार्डातील पंखे नादुरुस्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे मेडिकल प्रशासनाने पंखे, बंद असलेले दिवे आणि इतर उपकरण याची यादी पाठविली होती, पण अभियंत्याने याकडे लक्ष दिले नसल्याने पंखे, दिव्यांची दुरुस्ती देखील झालेली नाही. रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या घरून पंख्यांची व्यवस्था केली असल्याचे वॉर्ड क्र. १८ मध्ये दिसून येते. तसेच जिन्यातून रुग्णांना स्ट्रेचरवरून आणताना अंधारतूनच आणावे लागते.