मुख्यमंत्र्यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करून ऊसदराची घोषणा करावी. मुख्यमंत्री सहायता निधीला साखर कारखाने लाखो रुपये देतात. ते पैसे आमच्या घामाचे असल्याने मी मध्यस्थी करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांना घेता येणार नाही. चर्चा करणार नसाल तर सहकार खाते कशासाठी ठेवले आहे? सहकारमंत्री कशासाठी आहेत? मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी हात झटकून चालणार नाही. त्यांनी साखर कारखानदारीची बैठक घेऊन ऊस दराचा प्रश्न सोडवावा त्यासाठी आमची चर्चेची तयारी असल्याची भूमिका मांडताना, राज्यकर्त्यांचे ऐकून प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे सडे पडतील. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी राज्यातील एक लाख शेतकरी न्याय मागण्यासाठी १५ नोव्हेंबरला येणार आहेत. ही आरपारची लढाई असून, त्यात एकतर ऊस दराचा निर्णय तरी होईल किंवा सरकार तरी आम्ही पाडू असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला.
खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे शुक्रवारपासून होणाऱ्या आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, धनंजय महामुलकर, संजय भगत, विलास जाधव उपस्थित होते.
खोत म्हणाले, की ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळ रूजवली. त्या माध्यमातून साखर कारखानदारी उभी राहिली. मात्र, त्यांचेच नाव घेणाऱ्यांनी ही चळवळ उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे सहकारातूनच मोठे झालेल्यांनी खासगी साखर कारखानदारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोन महिने चर्चेसाठी वेळ मागत होतो. मात्र, त्यांनी वेळ दिला नाही. आता त्यांनी आम्हाला वेळ दिली आहे, मात्र, ही वेळ चर्चा करण्याची नाही. आम्हाला ठोस निर्णय हवा आहे.  
शेजारील राज्यामध्ये शासनानेच दर जाहीर केले आहेत. जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत आम्ही आंदोलनाची घोषणा केल्यांनतर आम्हाला आत्तापासूनच पोलिसांनी नोटिसा द्यायला सुरुवात केली आहे. आम्ही पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळून पिकवलेल्या उसाला कोयता लावताना आम्हाला दर तरी सांगावा, अशी आमची अपेक्षा आहे. आंदोलनामध्ये होणाऱ्या बरेवाईटाला शासन जबाबदार राहील. आंदोलन कसे असेल, याबाबत शेतकरी एकत्र आल्यानंतर निर्णय घेतील. कोणत्याही शेतकऱ्यांनी प्रश्न मिटल्याशिवाय उसाला कोयता लावू देऊ नये असे कळकळीचे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले. आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करीत गृहमंत्र्यांवरील संताप खोत यांनी व्यक्त केला. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करताना, तासगावचे आमदार संजयकाका पाटील यांच्यावरही टीकेची झोड उठवली.