ज्या प्रश्नाची तीव्रता अधिक, त्यावर बैठकीचे आश्वासनच तेवढे तातडीचे. जेवढय़ा अधिक तक्रारी, तेवढय़ाच जोरात अधिकाऱ्यांची झापाझापी. ही मंत्र्यांच्या कामाची जणू रीत बनली असल्याचे चित्र. पैठण येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात मराठी लोकसाहित्य समितीच्या अनुषंगाने झोंबेल अशा भाषेत टीका केल्यानंतर या समितीची बैठक ४ दिवसांत घेऊ व सर्व प्रश्न मार्गी लावू, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले. गेल्या दीड महिन्यांत या अनुषंगाने ना बैठक झाली, ना चर्चा.
मराठी लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षपदी अजूनही हिंदीचेच प्राध्यापक आहेत. या विषयावर आता कोणी ‘ब्र’ही काढत नाही. या अनुषंगाने तक्रार करणारे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील ‘अस्वस्थ’ आहेत. पैठण येथील मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मसापचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी मराठी लोकसाहित्य समितीचा दयनीय प्रवास सांगत मंत्री टोपे यांच्या कारभारावर टीका केली होती.
मराठवाडय़ातील तत्कालीन दोन मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून समितीसाठी बराच संघर्ष केला. तेव्हा दिलीप वळसे पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. बराच पाठपुरावा केल्यानंतर समितीचे कामकाज सुरू झाले. पुढे मंत्री बदलले व जालन्याचा माणूस समितीवर असावा, यासाठी समितीची पुनर्रचना करण्यात आली. समितीचे अध्यक्ष हिंदीचे प्राध्यापक आहेत. मराठीच्या विकासाला हिंदीचा प्राध्यापक कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
त्यांनी केलेली बोचरी टीका तेव्हा मंत्री टोपे यांना चांगलीच झोंबली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही टोपे यांचे कान टोचले होते. समितीची ४ दिवसांत बैठक घेऊन, उपस्थित केलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा करू, असे आश्वासन टोपे यांनी दिले. ठाले यांचे भाषण गाजले. टोपे यांचे आश्वासनालाही ठळक प्रसिद्धी मिळाली. या संमेलनाला दीड महिना झाला, ना बैठक झाली, ना चर्चा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहूमहाराज यांच्या साहित्याच्या फेरमुद्रणाविषयी नुकतीच बैठक झाली. या बैठकीस औरंगाबादहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकांच्या अनुषंगाने नेमलेले सदस्यही गेले होते. त्यांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या. बसण्यास जागा नाही, दूरध्वनी सुविधा नाही, कर्मचारी नाही, मुद्रितशोधक नाही, मंत्रालयात येण्यासाठी ओळखपत्रही नाही, असा पाढा त्यांनी वाचला. मंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस लक्ष्मण ढोबळे, वर्षां गायकवाड व नितीन राऊत हे कॅबिनेट मंत्रीही उपस्थित होते. या मंत्र्यांनी त्यांना सर्व सुविधा द्या, असे सांगितले. अध्यक्ष टोपे यांनीही आश्वासन दिले. आता ते पाळले जाईल का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. प्रश्नांचे गांभीर्य जेवढे तीव्र, तेवढेच तातडीचे आश्वासन असे चित्र निर्माण झाले आहे.