जेवढा आवाज मोठा, तेवढा आनंद मोठा.. मुंबईकरांच्या या पारंपरिक विचारसरणीत आजही फारसा फरक पडलेला नाही. ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या अपायांबाबत पाठय़पुस्तकांमधून धडे देण्याची वेळ आल्यावरही विसर्जनावेळी आवाजी प्रदूषणाने गणरायाला निरोप देण्यात आला. ढोल ताशे, डीजे यांच्या आवाजाने समुद्रकिनारे गांजून गेल्याचे दिसत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘आवाज फाऊंडेशन’ यांनी स्वतंत्ररित्या केलेल्या आवाजाच्या नोंदणीत हे दिसून आले आहे. विसर्जनाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशीही मिरवणुकीचे रस्ते ढोलताशांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटाने हादरले आणि आवाजाची पातळी १०० डेसिबलहून अधिक पोहोचली.
पूजेच्या वेळी लाऊडस्पीकरवर मोठय़ाने गाणी लावण्याची पद्धत आता उच्चमध्यमवर्गीय व मध्यमवर्गीयांमधून हद्दपार होताना दिसत आहे. गणेशोत्सवादरम्यानही घरातल्या घरात आवाज ऐकू येईल इतपत आवाजातील आरत्या व गाणी लावली जातात. हा आवाजस्नेही पवित्रा घेत काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मंडपापुरता आवाज ठेवण्याची काळजी घेतलेली दिसते. मात्र याचे प्रमाण अजूनही कमी आहे. त्यातच गणेशविसर्जनावेळी ध्वनिनियंत्रणाच्या नियमांना अनेक ठिकाणी तिलांजली दिल्याचे दिसले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरातील निवडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांजवळ ध्वनिप्रदूषणाचे मापन केले जात आहे. त्यानुसार लालबाग परिसरात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण नोंदले गेले. परळच्या टाटा मिल कपांऊंड येथील बाळ गोपाळ मंडळ, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इ. ठिकाणी ९० डेसिबलहून अधिक आवाज होता. खार, वांद्रे, बोरिवली येथील गणेशोत्सव मंडळांजवळही मोठे ध्वनिप्रदूषण सुरू होते.
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांप्रमाणे निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल तर व्यावसायिक परिसरात ६५ डेसिबलपर्यंत मर्यादा आखण्यात आली आहे. मात्र गणेशोत्सव काळात मुंबईत सर्वत्र आवाजाची पातळी यापेक्षाही अधिक होती.
‘आवाज फाऊंडेशन’ने विसर्जनाच्या तीन दिवसांमध्ये मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात किनारे व मिरवणुकांच्या रस्त्यांवर आवाजाची पाहणी केली. तेव्हा सेनाभवनसारख्या इतरवेळी गजबजाट असलेल्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त असल्याने आवाजाची पातळी कमी असल्याचे जाणवले. याउलट गिरगाव, वांद्रे, जुहू किनाऱ्यांजवळ आवाजाची पातळी १०० डेसिबलहून अधिक पोहोचली होती. ताडदेव रोड, दूरदर्शन, वरळी, पासपोर्ट ऑफिस, पोर्तुगीज चर्च, वांद्रे फायर ब्रिगेड, जुहू गार्डन, जुहू तारा रोड या ठिकाणी १०० डिसिबलहून अधिक आवाज होता.

मिरवणुकीत मोठे ध्वनिप्रदूषण
यावर्षी गेल्यावर्षीप्रमाणेच ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे. ध्वनिप्रदूषण मंडपाच्या परिसरापेक्षा विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणात होते. यंदा शिवाजी पार्कमध्ये मात्र शांतता होती. पण मुंबईतील विविध विभागांत ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असते. यामुळे याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.
सुमीरा अब्दुलाली, आवाज फाऊंडेशन.