विचार करू लागलो तर यशाचा मार्ग गवसतो, तसेच सार्थक जीवनाकडे वाटचालही करता येते. चांगला व वाम मार्गातील फरक कळतो. समस्यांना तोंड देण्याचे सामथ्र्य अंगी येते, असे विचार उद्घाटक टी. आर. के. सोमैया यांनी व्यक्त केले. कोका (जंगल) येथे गांधी विचार मंच आणि वनविभागाद्वारा आयोजित ‘यशाकरिता युवक’ या शिबिरात ते बोलत होते.
या जिल्ह्य़ातील २८ महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या शिबिरात भाग घेतला. प्रास्ताविक शिबीरप्रमुख महेश रणदिवे यांनी केले. शिबीर संकल्पना गांधी विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. वामन तुरिले यांनी स्पष्ट केली. या आठदिवसीय शिबिरात साहाय्यक वनसंरक्षक एम. एस. करुणाकर यांनी ‘संयुक्त व्यवस्थापन व युवक’ या विषयावर कार्यशाळा घेतली. ‘निसर्गोपचार’ हा विषय योगतज्ज्ञ, तसेच पोलीस बिनतारी संदेश विभागाचे वायरलेस ऑपरेटर प्रभाकरराव तडस यांनी हाताळला. ‘योगासने, निरोगी व निरागस जीवन व समाजपरिवर्तन’ या विषयावर पतंजली योग समिती नागपूरचे अध्यक्ष व मुख्य योगशिक्षक अभियंता संजय खोंडे यांनी कार्यशाळा घेतली. चर्चासत्रात त्यांनी सर्व शिबिरार्थीना बोलके केले. प्रसिद्ध काष्ठशिल्पकार एम. आर. साटोणे यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ व ‘कचऱ्यातून सोने’ या विषयावर प्रात्यक्षिके घेऊन शिबिरार्थीना कलेच्या प्रांतात अवगाहन करायला शिकविले.
जगातली क्रांती युवकांनी घडवून आणली. उद्याच्या कुशल व सुरक्षित भविष्याकरिता युवापिढीने आण्विक-शस्त्रस्पर्धा जगातून कमी व्हावी, याकरिता आवाज उठविणे काळाची गरज आहे. हे काम कठीण असले तरी अशक्य नाही, असे विचार ‘ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट वेपन्स अ‍ॅण्ड न्यूक्लिअर पॉवर इन स्पेस’ या संस्थेचे संचालक जे. नारायण राव यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी भंडारा येथील ‘घरेलू फलोद्यान व पर्यावरण रक्षण’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेश शर्मा होते. त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या केनिया येथील बंगारी मथाई यांनी पर्यावरण रक्षणाकरिता लावलेल्या ३ कोटी वृक्षारोपणाचा दाखला देत युवकांनी पर्यावरणरक्षणाकरिता वृक्षारोपणाचे कार्य स्वेच्छेने स्वीकारण्याचे आवाहन केले. जे. नारायण राव यांनी हिरोशिमा-नागासाकीचा विध्वंस, उद्याच्या अंतरिक्ष युद्धाची शक्यता आणि जागतिक राजकारण यावरही प्रकाशझोत टाकला. ‘अंधश्रद्धा’ हा विषय शिबिरार्थीशी प्रश्नोत्तरे करीत ग्यानचंद जांभूळकर यांनी विचारप्रवर्तक बनविला.
भंडारा जिल्ह्य़ाचा भूगोल, वनस्पती व ऋतुमान मधमाशीपालनाकरिता लाभदायक असून तरुणांनी या गृहोद्योगाकडे वळावे, तसेच अतिशय क्रूरपणे आग लावून मध गोळा करण्याची लोकांची पद्धत हाणून पाडावी, असे आवाहन प्रगतिशील शेतकरी, तसेच शल्यचिकित्सक डॉ. नितीन तुरसकर यांनी केले. अल्बर्ट आइन्स्टाइनचे, ‘जगातल्या मधमाश्या संपल्या तर मानवजात ४ वर्षांत नष्ट होईल’ हे वक्तव्य सांगत संबंधित अनेक बाबींचा युवकांना परिचय करून दिला.
सर्वसाधारण विद्यार्थी मोहन स्वत:ला घडवत महात्मा होतो, या अनुषंगाने चर्चेच्या माध्यमातून ‘यश’ या संकल्पनेवर प्रा. वामन तुरिले यांनी चर्चासत्रात ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, वेळेचे भान ठेवणारे यशस्वी होतात. कुठलीही संधी सोडू नका. नेमके ध्येय ठरवा, कामचुकारपणा कामाचा नाही. चुकांपासून शिका, अपयशाला उत्तम गुरू समजा, विषारी विचार व विषारी पुस्तके टाळा, या मुद्दय़ांवर चर्चा घडवून आणली. ‘स्पर्धा परीक्षा’वर मनीष चौधरी बोलले. शिबिरातील सर्व भाषणांवर, तसेच स्त्री सबलीकरण, लोकसंख्यावाढ, वनव्यवस्थापन इ. विषयांवर शिबिरार्थीनी पथनाटय़े सादर केली. शिबीर संचालन अर्चना रामटेके, मधुश्री गायधने, नितीन कारेमोरे, सागर भुरे, आशीष भोंगाडे, विलास केजरकर, राकेश कारेमोरे यांनी केले.

औरंगाबाद-जालना मार्गावर काही वर्षांपूर्वी गायिका अपूर्वा गज्जला हिचा अपघात झाला होता. त्यात ती जबर जखमी झाली होती. महिनाभर तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरू होते. आता ती पूर्ण बरी झाली असून पुन्हा गायला लागली आहे. व्यासपीठावर येताच औरंगाबादकर रसिकांनी तिचे जोरदार टाळय़ांच्या गजरात स्वागत केले.
अपूर्वा म्हणाली, की मी या अपघातातून वाचले. खरेतर माझा औरंगाबादेत पुनर्जन्म झाला आहे. त्यानंतर तिने ‘एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी’ हे गीत सादर केले.