‘तुमच्या मुलाचा चेहरा कित्ती गोड आहे. एखाद्या चॉकलेटच्या जाहिरातीत शोभेल..’ चार वर्षांच्या हरविंदरच्या गालाला हात लावून एका महिलेने जेव्हा असे म्हटले तेव्हा त्याच्या आईचा चेहरा कसनुसा झाला. ‘चेहरा तर सोडूनच द्या. पण, मी माझ्या मुलाचे नखही जाहिरातीत येऊ देणार नाही, असे ठरवून टाकले आहे..’ हरविंदरची आई कधीतरी घडलेला कटू प्रसंग डोळ्यासमोरून जबरदस्तीने बाजूला सारून सांगते. हरविंदरच्या आईचा अनुभवच तसा होता. तेव्हा तीन वर्षांच्या हरविंदरला गंमत म्हणून ती जाहिरातीत काम करू देत असे. एकदा एका बिस्किटाच्या जाहिरातीसाठी दिग्दर्शकाला म्हणे त्याचा रडवेला चेहरा हवा होता. म्हणून त्यांनी हरविंदरला दिवसभर झोपू दिलं नव्हतं. का तर म्हणे त्यामुळे त्याचा चेहरा ओढलेला, रडवेला होईल. तो झोपेला आला की सेटवरचं कोणीतरी त्याला जबरदस्तीने उठवित असे. घरी चिमुकल्या हरविंदरच्या जेवणाच्या, झोपेच्या वेळांबाबत सतत जागरूक असलेल्या त्याच्या आईला हे सगळं कधी एकदा संपतंय असं झालं होतं. हरविंदर इतका रडवेला होऊन गेला होता की शूटिंगनंतरही तो झोपायचं सोडून रडतच होता. निद्रादेवीनं त्याला कुशीत घेतलं ते थेट रात्री. तोपर्यंत हरविंदरनं रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं.
जाहिरात, सिनेमा, मालिकांमधील लहान मुलांच्या हसायला लावणाऱ्या अनेक प्रसंगांमागे अशा शेकडो रडवेल्या हरविंदरचे चेहरे आपल्याला दिसून येतील. कारण, आपले निर्माते चित्रपटात शेवटी ‘नो अ‍ॅनिमल्स वेअर हाम्र्ड’ अशा अर्थाची ओळ आवर्जून टाकतात. आमच्या चित्रपटात कोणत्याही प्राण्यांचे शोषण झालेले नाही, याची जबाबदारीच जणू चित्रपट निर्माता या ओळीच्या माध्यमातून घेत असतो. पण, प्राण्यांच्या हक्कांविषयी इतका जागरूक असलेला समाज लहान मुलांबाबत ही संवेदनशीलता दाखवित नाही.
भारतातील सुमारे ८५ टक्के जाहिरातींमध्ये या ना त्या पद्धतीने लहान मुलांचा वापर केला जातो. हिंदी मालिकांमध्येही हे प्रमाण ७० टक्क्य़ांच्या आसपास आहे. इतक्या मोठय़ा संख्येने बाल कलाकरांचा वापर होऊनही आपल्याकडे त्यांच्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभाव आहे. अमेरिका, युरोपादी देशांमध्ये बाल कलाकारांबाबतचे नियम स्पष्ट आहेत. तसेच आपल्याकडेही व्हावे असा प्रयत्न ‘अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’ या स्वयंसेवी संस्थेने सुरू केला आहे. त्यासाठी जाहिरात, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्यात येणार आहे. तसेच, गरज भासल्यास राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचीही मदत आम्ही घेऊ, असे या संघटनेच्या अध्यक्ष स्वाती पोपट वत्स यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सिनेमा, जाहिराती, मालिकांमध्ये नवजात शिशुपासून १० वर्षांच्या मुलांचा वारेमाप वापर करूनही ‘नो चाईल्ड वेअर हाम्र्ड’ या अर्थाची ओळ आजही आपल्या पाहण्यात येत नाही. कारण, लहान मुलांच्या बाबतीत या ओळीशी प्रामाणिक असलेले वातावरण सध्या तरी आपल्या सिने, जाहिरात वा मालिका क्षेत्रात नाही. मुलांचे बालपण अकाली हिरावून घेणाऱ्या अनेक गोष्टी ग्लॅमरच्या या चकचकीत दुनियेत होत असतात. म्हणूनच मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने हा प्रश्न ऐरणीवर आणायचे ठरविले असून त्यासाठी गरज भासल्यास उच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सुरुवातीला आम्ही या संबंधात चित्रपट, मालिका व जाहिरात क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करणार आहोत. सेटवर मुलांचे शोषण होऊ नये यासाठी आम्ही २१ निरनिराळे मुद्दे काढले आहेत. या मुद्दय़ांवर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू,’ असे वत्स यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आम्ही या प्रश्नावर न्यायालयातही याचिका दाखल करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी पुरविली.

बाल कलाकारांच्या संदर्भात पाळावयाची काही पथ्ये
*चित्रिकरणासाठी शाळा वर्षांतून केवळ १० दिवस बुडविण्याची मुभा दिली जावी
*दिवसभराचे चित्रिकरण केवळ पाच ते सहा तासांचे असावे. तेही साधारणपणे सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान असावे

*चित्रिकरणाचे ठिकाण सुरक्षित, स्वच्छ असावे. त्या ठिकाणी प्रसाधनगृहे, प्रथमोपचार, सकस अन्नपदार्थ यांची योग्य सोय असावी
*मुलांच्या तोंडी अश्लील गाणी व संवाद असू नयेत
*मुलांना हानी पोहचवतील असे प्रखर दिवे अथवा प्रकाशयोजना चित्रिकरणाच्या ठिकाणी असू नये
*मुलांच्या नाजूक त्वचेला साजेसे असे मेकअपचे सामान वापरले जावे
*चित्रिकरणाच्या ठिकाणी पालक सोबत असले पाहिजे
*मुलांना मिळणारा आर्थिक मोबदला त्यांच्या नावे बँकेत जमा केला जावा. त्यांच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये