ठाणे महापालिकेने जकात बंद करून त्याऐवजी सोमवारपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केल्याने शहरातील जकात नाके ओस पडल्याचे चित्र दिवसभर दिसत होते. जकात नाक्यांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत असे. मात्र, जकात नाके बंद करण्यात आल्याने शहरातील रस्त्यांनी काहीसा मोकळा श्वास घेतला खरा, मात्र वेगाने सुरू झालेल्या वाहतुकीचा भार या जकात नाक्यांजवळ असलेल्या टोल नाक्यांवर पडल्याचे चित्र दिसून आले. सकाळच्या वेळेत टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा वाढल्याने वाहतूक पोलिसांची भंबेरी उडाली आहे. जकात नाके बंद झाल्याचा हा परिणाम असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वाहतूक पोलिसांनी काढला आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार १ एप्रिलपासून स्थानिक संस्था कर लागू करून जकात पद्धती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने सोमवारी जकात बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू केला. ठाणे महापालिकेचे शहरातील वेगवेगळ्या भागांत सुमारे १९ जकात नाके असून त्यामध्ये आनंदनगर, विटावा, खारेगाव, बाळकूम घोडबंदर, कल्याण-शीळ या महत्त्वाच्या जकात नाक्यांचा समावेश होता. या सर्व जकात नाक्यांबाहेर जकात बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्यासंबंधीचे भले मोठे फलक लावण्यात आले आहेत. तसेच या जकात नाक्यांवर केवळ मार्गस्थ फी वसुलीचे काम सुरू होते.  महापालिका हद्दीत मालाची आयात करणाऱ्या वाहनांकडून या जकात नाक्यांवर जकात वसूल केली जात होती. त्यामुळे जकात भरण्यासाठी या नाक्यांच्या परिसरात वाहनांच्या भल्या मोठय़ा रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही होऊ लागला होता. मात्र, सोमवारपासून महापलिकेने जकात बंद केल्याने शहरातील सर्वच जकात नाके ओस पडले होते. तसेच शहरातील जकात नाक्यांवर दररोज जकात भरण्यासाठी थांबणारी वाहने आज सुसाट वेगाने धावत होती.  जकात नाक्यांवर प्रवेश बंद असल्याने या नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र, या जकात नाक्यांवरील वाहतुकीचा भार शहरातील टोल नाक्यांवर वाढू लागला आहे. याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांना मुंब्रा-बायपास टोल नाक्यावर दिसून आला. ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव येथील जकात नाक्यावर थांबायची. मात्र, हा जकात नाका आजपासून बंद करण्यात आल्याने वाहने थेट पनवेलच्या दिशेने निघाली. एकाच वेळी वाहने रस्त्यावर धावू लागल्याने मुंब्रा-बायपास टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड रांग लागली होती. पारसिक रेतीबंदपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरतच करावी लागली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अशीच अवस्था शहरातील आनंदनगर, घोडबंदर, बाळकूम भागात होण्याची शक्यता आहे. तसेच विटावा भागात वाहने न थांबता धावू लागल्याने कळवा पुलाच्या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे, मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पुलाजवळील रस्ता अरुंद असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
काही गाडय़ा चकटफू..
मुंब्रा-बायपास टोल नाक्यावर ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची प्रचंड मोठी रांग लागली होती, ही रांग थेट कळवा-पारिसकपर्यंत आली होती. त्यामुळे ऐन सकाळच्या प्रहरी वाहतूक पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. ही वाहतूक सुरळीत करताना त्यांच्या नाकीनऊ आले होते. अखेर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी टोल नाक्यावरून वाहने टोल न घेताच सोडू देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुमारे ५० ते ६० वाहनांना याचा चांगलाच फायदा झाला.