ठाणे शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून रुंद झालेल्या रस्त्यांना हळूहळू पुन्हा फेरीवाल्यांनी वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. मुख्यत: वर्दळीच्या ठिकाणचे बहुतेक पदपथ आता फेरीवाल्यांची बळकावले आहेत. दिवसभर थोडे आजूबाजूला दबा धरून बसलेले फेरीवाले सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी पदपथांवरच आपले दुकान थाटून पादचाऱ्यांची वाट अडवू लागले आहेत.   महापालिका आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कारकीर्दीत शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊन टपऱ्यांचे शहर अशी ठाणे शहराची एकेकाळची बदनाम ओळख पुसली गेली. रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवून सॅटिस प्रकल्पाद्वारे येथील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह फोडण्यास महापालिका प्रशासनास यश आले. मात्र सध्या परिस्थिती पाहिली तर पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था आहे. सॅटिसच्या पुलाखाली फेरीवाले बिनदिक्कतपणे  दिसतात.  आधीच अरुंद असणाऱ्या जुन्या बाजारपेठ रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बरेच आक्रमण दिसून येते. गोखले रोडच्या पदपथांवरही फळे आणि भाजीविक्रेते दिसतात.  दोन महिन्यांपूर्वी दादा पाटील वाडीतून ठाणे स्थानकाकडे जाण्याच्या मार्गात असणाऱ्या खाद्य पदार्थाच्या हातगाडय़ा अतिक्रमण विरोधी पथकाने तोडल्या होत्या. मात्र आता त्या पुन्हा जैसे थे.. रेल्वे व महापालिका हद्दीची संदिग्धता लक्षात घेऊन फेरीवाले सीमारेषेवरच राहून दोन्ही आस्थापनांना चकवा देतात. गेल्या महिन्यात  वृत्तपत्राच्या छायाचित्रकारास फेरीवाल्यांनी मारहाण केली.  रस्त्यालगतच्या दुकानांचे विस्तारित स्वरूपही आहेच.  यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील होते. अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी आली की तेवढय़ापुरते हे फेरीवाले आपला बाडबिस्तारा गुंडाळतात.त्यामुळे महापालिका प्रशासन फेरीवाल्यांवर कारवाईचे केवळ नाटक तर करीत नाही ना, अशी नागरिकांना शंका आहे..