30 October 2020

News Flash

उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांचे भवितव्य एक कोटी पाच लाख मतदारांच्या हाती

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, रावेर आणि नंदुरबार या सहा लोकसभा मतदारसंघात गुरूवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होत आहे.

| April 24, 2014 12:13 pm

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, रावेर आणि नंदुरबार या सहा लोकसभा मतदारसंघात गुरूवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होत आहे. मतदानाचा कालावधी यंदा दोन तासांनी वाढविण्यात आला असून नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन सर्व स्तरातून करण्यात आले आहे. बुधवारी प्रशासनाने मतदानासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्णत्वास नेली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, याकरिता ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेरे तसेच केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा लक्ष ठेवणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील एकूण एक कोटी पाच लाख २६ हजार २१५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नाशिकचा विचार करता जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी या लोकसभा मतदारसंघासह धुळे मतदार संघाचाही काही भाग समाविष्ट होतो. त्यात नाशिक मतदार संघातील १५ लाख ९३ हजार ५०५, दिंडोरीत १५ लाख २९ हजार ५०५ तर धुळे मतदारसंघातील सात लाख ६४ हजार २९६ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ४१९१ मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्यात नाशिक मतदारसंघात १६६४, दिंडोरीत १७५० तर धुळे मतदार संघातील ७७७ केंद्रांचा समावेश आहे. राज्यातील तिसऱ्या टप्प्यात होणारी ही मतदान प्रक्रिया नियोजनबध्दपणे पार पाडण्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यात एकूण १८ हजार ७४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यात नाशिक मतदार संघात नऊ हजार १६० तर दिंडोरीतील नऊ हजार ६४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात ६७ संवेदनशील केंद्र असून या ठिकाणी काटेकोरपणे नजर ठेवली जाणार आहे. त्यातील काही केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवून संशयास्पद हालचाली टिपल्या जातील. तसेच जादा पोलीस बंदोबस्ताद्वारे गोंधळ वा तत्सम प्रकार हाणून पाडण्याची तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व निवडणूक आयोगाने केले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून तब्बल १० हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या शिवाय, राज्य राखीव दल आणि केंद्रीय राखीव दलाच्या प्रत्येकी तीन तुकडय़ांची संवेदनशील मतदार संघासाठी तजविज करण्यात आली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात एकूण १६ लाख ७२ हजार ०२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. एकूण १७१८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होईल. त्यातील ३७ केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी आठ हजार ५९० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जळगाव, नाशिक व नंदुरबार या सीमावर्ती भागात लक्ष ठेवण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहे. या शिवाय, गुजरात सीमेवर तसेच अन्य भागात राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात १७ लाख ३०४१ तर रावेर मतदारसंघात १५ लाख ९१ हजार ४८९ मतदार आहेत. जळगाव मतदारसंघात १८९० मतदान केंद्रांवर तर रावेरमध्ये १७२१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होईल. त्यात एकूण ७३ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तब्बल २० हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.  सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबार  मतदार संघात १६ लाख ७१ हजार ९९७ मतदार असून १९८४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्र संवेदनशील असून दुर्गम भागात व बार्जद्वारे एखाद्या भागात जावे लागेल, अशी एकूण १३ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रिया सर्व भागात शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने बुधवारी सर्व तयारी पूर्णत्वास नेली.

शिधापत्रिकेवर प्रथमच फुली
मागील महापालिका निवडणुकीपर्यंत ओळखपत्र म्हणून शिधापत्रिका अर्थात रेशनकार्डच्या झालेल्या वापरावर यंदा निवडणूक आयोगाने र्निबध आणले आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान करताना शिधापत्रिकेचा ओळखपत्र म्हणून वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाने मतदानासाठी आवश्यक असलेल्या ओळखपत्राच्या यादीतून शिधापत्रिकेला वगळले आहे. निवडणूक मतदार कार्ड नसलेल्या मतदारांना छायाचित्र असणाऱ्या ११ ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आला आहे. पारपत्र, वाहन परवाना, शासकीय-निमशासकीय अथवा कंपनीचे छायाचित्र असणारे ओळखपत्र, बँक अथवा टपाल खात्याचे छायाचित्र असणारे खातेपुस्तक, पॅनकार्ड, आधार कार्ड, महानिदेशक भारत सरकार यांच्यामार्फत जनगणनेसाठी वितरीत केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, श्रम मंत्रालयामार्फत वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असणारे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज आणि बीएलओ मार्फत वितरित छायाचित्र असणारी मतदार चिठ्ठी यापैकी कोणताही एक ओळखपत्र मतदारांना सादर करता येईल.

मतदान केंद्रात पक्षचिन्हांची साधने वापरण्यावर र्निबध
मतदान केंद्राबाहेर पक्षचिन्ह असणारी टोपी व उपरणे घालून मतदारांना अभिवादन करणारे राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांना या अवस्थेत मतदार केंद्रांमध्ये जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. पक्षाचे नांव, चिन्ह, घोषवाक्य असणारी कोणतीही साधने मतदानाच्या दिवशी केंद्रात नेता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे. मतदानावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते केंद्राबाहेर व आतमध्ये भ्रमंती करत असतात. मतदारांना अभिवादन करण्यासाठी केंद्राबाहेर थांबलेले उमेदवार व पदाधिकारी आपल्या पक्षाचे चिन्ह असणारी टोपी व उपरणे परिधान करतात. त्याच अवस्थेत ही मंडळी अनेकदा केंद्रातही भ्रमंती करतात. ही बाब अप्रत्यक्षपणे मतदारांवर प्रभाव टाकणारी ठरते. यामुळे पक्षाचे नांव, पक्षचिन्ह असणारी टोपी अथवा उपरणे परिधान करून मतदान केंद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पक्षचिन्ह नसणारी वा राजकीय पक्षांचे नांव नसणारी टोपी वा उपरणे परिधान करता येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

मतदार मदत केंद्र (विधानसभा मतदारसंघनिहाय)
मतदानाच्या दिवशी आपले नांव मतदार यादीत आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी मतदारांना नजीकच्या मतदार मदत केंद्रात, महा ई सेवा केंद्र व सेतू कार्यालयात संपर्क साधता येईल. या शिवाय, जिल्हा निवडणूक यंत्रणेने मतदारांच्या सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघ निहाय मदत केंद्रांची स्थापना केली आहे. या केंद्रावर संपर्क साधून उपरोक्त माहिती घेता येईल. तसेच १८०० २३३ २०१५ या मतदार मदत वाहिनीवर संपर्क साधता येईल. विधानसभा मतदारसंघनिहाय मदतवाहिन्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे.
*  नाशिक पूर्व – (०२५३) २३१०६५६
* नाशिक मध्य – (०२५३) २३१३२५२
*  नाशिक पश्चिम – (०२५३) २२३२३४६
* देवळाली – (०२५३) २२३२३५२
*  इगतपुरी – (०२५५३) २४३९७०, त्र्यंबकेश्वर (०२५९४) २३३३५५
*  सिन्नर – (०२५५१) २२००२८
*  नांदगाव – (०२५५२) २४२०३२
*  मालेगाव मध्य – (०२५५४) २५४७३२
* मालेगाव बाह्य – (०२५५४) २५४७३२
* बागलाण – (०२५५०) २२३०३८
* कळवण – (०२५९२) २२१०३७
*  चांदवड – (०२५५६) २५२२३१, देवळा (०२५९२) २२८५५४
* येवला – (२५५९) २६६४०५
*  निफाड – (०२५५०) २४१०२४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2014 12:13 pm

Web Title: one crore five million voters decide the future of north maharashtra candidates
Next Stories
1 उमेदवारांनी मनमाडमध्ये प्रचार करणे का टाळले?
2 मतदान साहित्य वाटप केंद्रात निष्काळजीपणाचे दर्शन
3 फुलांना पायदळी तुडवताना काटय़ांना किती जपावं लागतं..
Just Now!
X