शेतांमध्ये माझा कोप तिला बोराटीचा झाप.. तिथे राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप.. ही कविता प्रा. इंद्रजित भालेराव सादर करून सर्वानाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देत उठ उठ चिऊ ताई.. आणि औदुंबर ही कविता सादर करून साहित्यातील निसर्गाची उतरण रसिकांच्या मनात केली. निमित्त होते ते वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात नवी मुंबई साहित्य परिषद आणि मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ व विश्व संवाद केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय पर्यावरणीय साहित्य संमेलनचे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांपासून ते कवयित्री इंदिरा संत, बालकवी, कवी कुसुमाग्रज अशा अनेक साहित्यिकांनी निसर्गाच्या विविध अंगांचे रेखाटन आपल्या शैलीतून केले आहे. त्यांनी निर्माण केलेले साहित्य आजही मनाला भुरळ घालणारे आहे. मात्र वॉटसअप, फेसबुकच्या या युगात नवोदित पिढीत साहित्य याविषयी जागर होत नसल्याची खंत कवी  प्रा. इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केली. आजच्या तरुण पिढीला पर्यावरण आणि निसर्ग साहित्याकडे वळवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरापासून आतापर्यंतच्या सर्वच निर्सगाचे अप्रतिम रेखाटन केले आहे. साहित्य आजही जिवंत आहे ते पाठयपुस्तकामुळेच असे सांगत माडगुळकर, कुसुम्राग्रज, केशवसुत, ना. धों. मनोहर यांच्या कविता प्रा. भालेराव यांनी सादर करून केल्या.
 समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जीवन आणि आरोग्य राहण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे आवश्यक असून प्रत्येकाने वृक्षारोपणसारखी मोहीम हाती घेऊन पर्यावरण समृद्ध केले पाहिजे, असे मत भालेराव यांनी या वेळी मांडले. मानवाच्या हस्तक्षेपामुळे ऋतुचक्रामध्ये बदल होत असून दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीठ आदींसारख्या घटना दरवर्षी घडू लागल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्रत्येकाने पुढे येण्याचे गरजेचे असल्याचे मत कौमुदी गोडबोले यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात अनेक बालकवींनी अप्रतिम कविता सादर केल्या. रा. फ. नाईक शाळेतील विद्यार्थी आदित्य मोरे यांने आपल्या दमदार आवाजात नको रे पावसाळा ही कविता सादर करून महाराष्ट्रात झालेल्या गारपीठामुळे शेतकऱ्यांची झालेली वाताहत मांडली. अंधेरीच्या साक्षी वाईकर, आयसीएल हायस्कूलच्या कुमार भोर, कोपरखरणे येथील इंदिरा गांधी हायस्कूलच्या श्रमिका पराईत यांनी मानवी जीवनाची शिकवण देणारी या वेळी चिऊताईची कविता, पावसात नटलेली वसुंधरा अशा निसर्गाचा आविष्कार सांगणाऱ्या कविता सादर केल्या. मॉडर्न महाविद्यालय वाशीच्या सोनल गवस, दहिसर मुंबईच्या सुनंदा पाटील, योगिता साळवी, वृषाली बापट या गृहिणींनी देखील कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा कुलकर्णी यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुभाष कुलकर्णी यांनी केले.