कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीमध्ये भर घालणारे नवीन वाण निर्माण झाले पाहिजे. त्याकडे कृषी संशोधकांनी लक्ष देऊन कृषी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
पुणे रस्त्यावर शहरालगत केगाव येथे पाच कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले, त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास फलोत्पादनमंत्री डॉ. विजयकुमार गावित, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शेकापचे नेते गणपतराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक बाजारपेठेत डाळिंब फळाच्या निर्यातीबाबत भारताचे प्रमाण दहा टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. ते कसे वाढेल याचा विचार झाला पाहिजे. देशांतर्गत कृषी संशोधनासाठी ८० पेक्षा अधिक संस्था कार्यरत असून त्याद्वारे सुमारे पाच हजार संशोधक विविध फळपिकांवर तसेच इतर अन्नधान्य उत्पादनावर संशोधन करीत  आहेत. राज्यात फुलांवरही संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पवार यांनी नमूद केले. डाळी, तेलबिया, मत्स्य उत्पादन वाढविले पाहिजे, सामान्य माणसाला फळे, भाजीपाला सहजपणे उपलब्ध झाला पाहिजे. आधुनिकतेचा स्वीकार करून नव्याने झालेले संशोधन शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. अधिक दूध उत्पादन देणाऱ्या उत्तम जातीच्या दुधाळ जनावरांच्या प्रजातीसाठी नगर जिल्ह्य़ात राहुरी येथे सिमन (वीर्य) केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही पवार यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, शेती व शिक्षण यांच्या समन्वयातून देशाची प्रगती होते. या सोलापूरच्या राष्ट्रीय डािळब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी डाळिंब फळाबाबत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत जाऊन माहिती द्यावी. हे संशोधन केंद्र देशातील अग्रेसर संशोधन केंद्र ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राज्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रात डाळिंब लागवड करण्यात आली असून यासंदर्भात सुरू करण्यात आलेल्या ‘अनार नेट’चा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, तसेच विविध फळ पीक विमा योजना स्वीकारण्याबाबत शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन फलोत्पादनमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. या वेळी सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांचेही भाषण झाले.
देशात एक लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झाली असून डाळिंब निर्यातीतून सुमारे १५० कोटींचे परकीय चलन मिळाल्याची माहिती देत, या डाळिंब संशोधन केंद्रात आणखी जास्त संख्येने शास्त्रज्ञ उपलब्ध व्हावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादकसंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी केली. डाळिंब संशोधन केंद्राचे विभागीय सचिव डॉ. एस. अयप्पन यांनी प्रास्ताविक केले, तर आर. के. पाल यांनी आभार मानले.