अर्बन सहकारी बँकेतील विरोधी संचालक कुठल्या तत्वासाठी किंवा बँक हितासाठी विरोध करत नाहीत, त्यांचा केवळ विरोधासाठी विरोध आहे. कदाचित त्यांना आपल्या नावाची ‘अ‍ॅलर्जी’ असेल. त्यांच्या विरोधाने काही फरक पडत नाही. बहुमत आमचेच आहे, घोडा मैदानही जवळ आले आहे, सभासदांना पटले तर ते आम्हाला परत निवडून देतील, अन्यथा घरी बसवतील, अशा शब्दात बँकेचे अध्यक्ष, खासदार दिलीप गांधी यांनी विरोधी संचालकांना आव्हान दिले.
बँकेच्या १३ संचालकांनी तोटा व अन्य कारणे देत नवीन शाखा उघडण्यास, तसेच जुन्या शाखांचे नूतनीकरण करण्यास विरोध केला. निवडून आलेल्या २५ पैकी १३ संचालक विरोधात गेल्याने गांधी अल्पमतात आल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर आज गांधी यांनी बँकेच्या विकास योजनांची माहिती देण्याचे कारण देत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा खुलासा केला.
यावेळी बँकेच्या मुख्य शाखेतील कोअर बँक प्रणालीचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आले. संचालक मुकुंद मुळे, शैलेश मुनोत, आर. सी बोरा आदी उपस्थित होते. गुंदेचा यांनी मात्र कोणतेही भाष्य केले नाही. ३० पैकी १७ संचालक आमचेच असल्याचे सांगत गांधी यांनी बहुमताचा, तसेच बँकेची निवडणूक लवकरच होईल, त्यावेळी आमचे मुळचे १२ संचालक आमच्याच बरोबर असतील, असा दावा केला. सातत्याने विरोध करणाऱ्या संचालकांच्या विरोधात योग्य ठिकाणी तक्रार केल्याचेही गांधी यांनी स्पष्ट केले. १०२ वर्षांच्या जुन्या बँकेच्या वाढीसाठी, आधुनिकरणासाठी काही करणार की नाही, असा प्रश्न ते संचालक विचारतात आणि दुसरीकडे नूतनीकरण केले की विरोध करण्याची दुहेरी भूमिका घेतात, असा आरोप त्यांनी केला. महिनाभरात कोअर बँक प्रणालीचे काम पूर्ण होईल, सध्या ४० पैकी ३७ शाखांचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात सुरु झालेल्या ८ शाखांपैकी केवळ नाशिक, औरंगाबाद व चाकण या तीनच शाखा तोटय़ात आहेत, त्याही अलिकडेच सुरु झाल्याने सुरुवातीच्या खर्चामुळे तोटा दिसत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनेच परवानगी दिल्याने येत्या फेब्रुवारीपर्यंत टाकळीमानूर, आळेफाटा, सिन्नर, दौंड, चंदननगर (पुणे), कडा व पिंपरी या ८ शाखा सुरु करण्याचे नियोजन आहे, कितीही विरोध झाला तरी त्या सुरु होणारच, विरोध करणारे या विषयावर संचालक मंडळाच्या सभेत काही बोललेच नाहीत, नवीन शाखा सुरु करणे हा व्यवसायवृद्धीचाच एक भाग आहे, बँकेच्या ठेवी रोज वाढत असल्याने विरोधकांना काही अर्थ राहिला नाही, असे गांधी म्हणाले.
गांधी यांनी जाहीर केलेले निर्णय
– एप्रिलपर्यंत डिमॅट पद्धत विमा क्षेत्रात प्रवेश
– कोअर बँक होताच मार्चमध्ये एटीएम
– निवडणुकीपूर्वी १ हजार कोटींच्या ठेवींचे लक्ष्य
– सर्व कर्मचाऱ्यांना गणवेष वाटप
– नवीन पद्धतीचे १२ आकडी धनादेश वितरण सुरू
– १२ तासांत वाहन कर्ज