मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या प्रकारांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. प्रत्येकाने नीतिमूल्यांची जोपासना करावी व महिलांवरील अत्याचार थांबवावेत, असे मत माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ, तसेच त्याविषयी तक्रार निवारणावर चर्चासत्राचे आयोजन बुधवारी प्राणिशास्त्र विभागातील सेमिनार हॉलमध्ये झाले. या वेळी न्या. चपळगावकर बोलत होते.
कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे अध्यक्षस्थानी, तर डॉ. नीता पांढरीपांडे यांची या वेळी उपस्थिती होती. प्रथम सत्राच्या अध्यक्ष डॉ. अनघा पाटील व वक्त्या डॉ. निशा शेंडे (अमरावती), दुसऱ्या सत्रात वक्ते अ‍ॅड. संघपाल भारसाकळे यांची उपस्थिती होती.
न्या. चपळगावकर म्हणाले, की स्त्रियांनी मोकळेपणाने वागत असताना स्वत:चे निकष स्वत: आखून वागले पाहिजे. कार्यालयातील भ्रष्टाचार पैशापुरता मर्यादित नसून स्त्रियांचा उपभोग घेणे किंवा लैिगक अत्याचार करणे हादेखील भ्रष्टाचाराचा भाग आहे. सर्वानी महिलांचा आदर करून आपली मानसिकता बदलली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. पांढरीपांडे म्हणाले, की महिलांवरील अत्याचार ही गांभीर्याची बाब आहे. सूत्रसंचालन नजमा शेख यांनी केले. डॉ. एम. बी. मुळे यांनी आभार मानले.