लिंबूवर्गीय फळांमध्ये सर्वात लहान लिंबू आणि सर्वात मोठा संत्रा एवढीच लिंबूवर्गीय फळांची ओळख आपल्याला आहे, पण मूळ नागपूरचीच उत्पत्ती असलेले ‘पमेलो’ हे फळ अवघ्या विदर्भाला अपरिचित झाले आहे. जीवनसत्व ‘क’ व्यतिरिक्त इतरही गुणधर्म असलेल्या या फळाला पुनरुज्जीवन देण्यासाठी नागपुरातीलच राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान केंद्राने आता पुढाकार घेतला आहे. कृत्रिम आणि संकरित वाटणाऱ्या या फळाच्या लागवडीसाठी विदर्भातला शेतकरीसुद्धा तयार झाला आहे.
धान्य, फळे यांचे अनेक वाण विदर्भातून नष्ट होत असले तरीही राज्यातील इतर भागात, इतर राज्यात आणि परदेशात मात्र ते उपलब्ध आहेत. लिंबूवर्गीय फळातील सर्वात मोठे असे ‘पमेलो’ हे फळ याच प्रकारात मोडणारे आहे. अमेरिकेत हे फळ  ‘ब्रेकफास्ट फूड’ म्हणून वापरले जाते. उत्तरेकडील आणि पुर्वेकडील भागात या फळांची लागवड आहे. प्रामुख्याने कोकण, गोवा, बिहारमध्ये या फळाची लागवड आजही मोठय़ा प्रमाणात केली जाते. बिहारमध्ये छट पुजेत आणि बंगालमध्ये दुर्गादेवीच्या पुजेत या फळाचा आवर्जून वापर केला जातो. बियाणे लावून या फळझाडाची लागवड करण्यात आली नाही, तर नैसर्गिकरीत्या या फळझाडाची लागवड झाली आहे.
नागपूर आणि आसपासचा परिसर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. याच संत्रानगरीच्या परिसरात ‘पमेलो’ची उत्पत्ती झाली आहे. मात्र, हे फळच येथून नामशेष झाल्याने नव्याने त्याची ओळख पटवून देण्यासाठी आता राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान केंद्राने पुढाकार घेतला आहे.
रामन विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या विज्ञान मेळयात लिंबू, संत्र्याच्या बरोबरीने हे फळ ठेवण्यात आले, तेव्हा फुटबॉलच्या आकाराचे हे फळ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कृत्रीम वाटणाऱ्या या फळाला हात लावून पाहिल्यानांतर ते कृत्रिम नसल्याची खात्री यावेळी त्यांनी करुन घेतली. हे संकरित फळ तर नाही ना, खरोखरीच हे लिंबूवर्गीय फळ आहे ना अशी एक ना अनेक प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांसह मोठय़ांचाही सहभाग होता. कित्येकांनी कुतुहलापोटी या फळाची चवसुद्धा चाखून बघितली.
नुकत्याच पार पडलेल्या कृषी प्रदर्शनातसुद्धा केंद्राने हे फळ ठेवले होते. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केल्या, पण त्यांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर मात्र त्यांनीच या फळझाडांची मागणी केली. त्यावेळी उपलब्ध तेवढी फळझाडे त्यांना दिली. सध्या या फळझाडाच्या लागवडीसाठी केंद्राकडे जमीन नाही, तरीही उपलब्ध जागेवर ती लावण्यात आलेली आहे.
ही फळझाडे केंद्रातर्फे शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार असल्याचे केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ. विनोद अनाव्रत यांनी सांगितले.