एखादी सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाचे मुख्य माध्यम राजकीय व सामाजिक संघटना या आहेत. अशाच पद्धतीने पनवेल परिसरात वाढलेल्या डासांना प्रतिबंध करण्यासाठी राजकीय व्यासपीठावरून डासमुक्त पनवेल करण्याची मोहीम शेतकरी कामगार पक्षाने हाती घेतली आहे. याचे नेतृत्व माजी आमदार विवेक पाटील हे करीत आहेत.
नुकतेच सुकापूर गावात या डासमुक्त अभियानासाठी ग्रामस्थ व शेकापच्या कार्यकर्त्यांची सभा घेतली गेली. या जनजागृती सभेमध्ये माजी आमदार पाटील यांनी पनवेलमध्ये काही वर्षांपूर्वी दरोडेखोरांनी थैमान घातले होते त्या वेळीही ग्रामस्थांनी एकजूट होऊन दरोडेखोरांना पनवेलमधून पळवून लावले असा दाखला देऊन या डासांसाठी गावाखेडय़ातील महिलावर्गानी एकत्र येण्याचे आवाहन केले.
डासांचा हा सामाजिक प्रश्न पनवेलच्या राजकीय पक्षांनी मांडल्यामुळे भविष्यात शेकाप ग्लोबल होण्याच्या उंबरठय़ावर असल्याचे बोलले जात आहे. डास हाकलण्याचा निर्धार करण्यासाठी शेकापचे कार्यकर्ते जनजागृती मोहीम घेणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. स्वच्छ पाण्याची साठवणूक टाळा, आठवडय़ात पाण्याची भांडी एकदा तरी कोरडी करा, असा सल्ला पाटील यांनी या जनजागृतीमोहिमेदरम्यान ग्रामस्थांना दिला.