जिल्ह्यात मोठे उद्योग टिकू शकले नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. शेतीशी निगडित दळणवळणाच्या सुविधाही गरजेनुसार उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी परभणी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मागे आहे. हे चित्र बदलण्यासाठी या विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस उमेदवारास विधानभवनात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असा सूर काँग्रेसच्या ब्लॉकस्तरीय मेळाव्यात उमटला.
परभणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बी. रघुनाथ सभागृहात ब्लॉकस्तरीय ‘बीएलए’ चे शिबिर व वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन केले होते. पक्षनिरीक्षक टी. पी. मुंढे, जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, युवक काँग्रेसच्या लोकसभा अध्यक्षा मेघना बोर्डीकर, पंजाब देशमुख, आनंद भरोसे, डॉ. विवेक नावंदर, बाळासाहेब देशमुख, भगवान वाघमारे, इरफान ऊर्फ रहेमान आदी उपस्थित होते. देश व राज्य पातळीवर काँग्रेसच्या वतीने सर्वसामान्यांसाठी ज्या काही कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, त्या सामान्यांपर्यंत पोहोचल्या असून, या संदर्भात सर्वसमावेशक व योग्य माहिती पोहोचविण्यासाठी पक्षाकडून देण्यात आलेल्या वचनांची पूर्तता कशा पद्धतीने झाली आहे. याची माहिती या मेळाव्यातून देण्यात येत आहे, असे सुरेश देशमुख यांनी सांगितले. बूथस्तरीय पदाधिकाऱ्यांनी सामान्यांपर्यंत वचनपूर्तीची भूमिका मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मागील ३० वर्षांपासून परभणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस उमेदवारास विधानभवनात प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने हे क्षेत्र विकासापासून वंचित आहे. मोठे उद्योग येण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही. हे चित्र आता बदलावे लागेल. या साठी विधानभवनात येथील उमेदवारास प्रतिनिधित्व मिळायला हवे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. इलियासोद्दीन खतीब यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर मुळे यांनी आभार मानले.