लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरलेला. खासदार चंद्रकांत खैरे तयारीला लागले आहेत. काँग्रेसच्या गोटात मात्र उमेदवार कोण, हे अजून निश्चित नाही. कधी ठरेल, कोणालाच माहीत नाही. त्यामुळे उमेदवार कोण या प्रश्नाभोवती निर्माण झालेल्या पोकळीत आम आदमी पक्षाने नव-नवे चेहरे चर्चेत उतरविले आहेत. एक नाव पुढे करायचे आणि उमेदवारीसाठी त्यांनी नको म्हणायचे, असेच वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या मुख्य समन्वयक अंजली दमानिया शहरातील प्रसिद्ध वकील सतीश तळेकर यांची बुधवारी भेट घेतली. सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर तळेकर यांनी ‘अजून माझी निवडणूक लढविण्याची मानसिकता नाही,’ असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
काँग्रेसमधून मलाच उमेदवारी मिळेल, असा दावा करणारे काहीजण आहेत, तर काही मंडळी उमेदवारीसाठी दिल्लीतले नेते आल्यावर त्यांच्या पुढेपुढे करतात. काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने सशक्त पर्याय म्हणून आम आदमी कोणाला रिंगणात उतरविते, याची चर्चा सुरू झाली आहे. मराठवाडय़ात सनदी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सुनील केंद्रेकर व तुकाराम मुंढे यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यांचेही उत्तर ‘राजकारणात येण्याची मानसिकता नाही’ असेच होते. आता नव्या चर्चेत अॅड. सतीश तळेकर यांचे नाव पुढे आले आहे. औरंगाबाद शहराचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘डॉ. रफिक झकेरिया राजकारणात असताना त्यांनी औरंगाबादचा विकास मोठय़ा वेगात केला. औद्योगिक विकासापासून ते शैक्षणिक विकासापर्यंत त्यांनी दिलेले योगदान आजही महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यानंतर मात्र हा विकास तसा खुंटला आहे. या पाश्र्वभूमीवर चांगल्या माणसांनी राजकारणात यावे, हे खरे आहे. पण मी व्यवसायात गढून गेलेला माणूस आहे. त्यामुळे राजकारणात येण्याचा विचारही कधी केला नाही. तो माझा पिंड नाही. सध्या तरी मानसिकता नाही,’ असे अॅड. तळेकर यांनी सांगितले.
तळेकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी ‘आप’चे ४० ते ५० कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले होते. डाव्या चळवळीचे नेतृत्व करणारे डॉ. भालचंद्र कांगो त्यांच्या पक्षाने सांगितले तरच निवडणुकीच्या मैदानात उतरतील. समाजवादी जनपरिषदेनेही सुभाष लोमटे यांचे नाव पुढे केले आहे. या दोघांपैकी कोण उमेदवार होतो व कोण माघार घेतो, याचीही चर्चा आहे. या पोकळीत अॅड. तळेकरांचेही नाव दिवसभर चर्चेत होते.